कल्याण-डोंबिवलीत म्युकरमायकोसिसचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:57+5:302021-06-02T04:29:57+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे साइट इफेक्ट दिसून येत आहेत. पोस्ट कोविड रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. आतापर्यंत ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे साइट इफेक्ट दिसून येत आहेत. पोस्ट कोविड रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीत याचे ४३ रुग्ण आढळले असून, यातील १२ रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, यापैकी महापालिकेच्या एका सुरक्षारक्षकावर एक डोळा गमाविण्याची वेळ आली आहे.
म्युकरमायकोसिस हा आजार पोस्ट कोविड रुग्णांमध्ये कोरोना उपचाराचे दुष्परिणामातून होतो. महापालिका हद्दीत सगळ्यात प्रथम म्युकरमायकोसिसने एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. शहरातील खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार केले जात आहेत. महापालिका रुग्णालयात उपचार करण्याची सुविधा नसून यावरील उपचार खर्चीक आहेत. महापालिकेने तूर्तास रुक्मिणीबाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्याबरोबर या आजारावरील १०० इंजेक्शन कंत्राटदारामार्फत मागविण्यात आली होती. मात्र, महापालिका रुग्णालयात उपचारच केले जात नाही. त्यामुळे तूर्तास ते मागविण्याचा विषय स्थगित ठेवला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णास इंजेक्शन हवे असल्यास ते सिव्हिल सर्जनकडे असून, सरकारच्या पोर्टलवर त्याची नोंदणी करून संबंधित रुग्णाला इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. आतापर्यंत आढळलेल्या ४३ रग्णांपैकी १८ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर १२ जणांवर उपचार सुरू आहेत. १३ रुग्णांना अन्य रुग्णालयांत उपचारासाठी हलविले आहे. आढळलेले बहुतांश रुग्ण हे महापालिकेच्या हद्दीबाहेरील असल्याचे प्रशासनाने सांगितले.
महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात काम करणारे सुरक्षारक्षक संजय निकम यांना ३ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात दाखल केले होते. उपचार घेऊन ते ११ एप्रिल रोजी बरे झाले. कोरोनामुक्त झाल्यावर ते घरी परतले. १४ एप्रिल रोजी त्यांना प्रचंड डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. ते शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेले. त्या ठिकाणी त्यांना डॉक्टर उपलब्ध न झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात निदान केले असता त्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाली. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार केले. मात्र, त्यांना त्यांचा डावा डोळा काढावा लागला. त्यांच्या उपचारासाठी दोन लाख रुपयांचा खर्च झाला आहे. ते आता कामावर रूजू झालेले आहेत. मात्र, त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्च हा महापालिकेने द्यावा, अशी मागणी केली आहे. याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर मंजुरीसाठी ठेवला असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------------