कल्याण-डोंबिवलीत शिवजयंती उत्साहात
By Admin | Published: February 20, 2017 05:31 AM2017-02-20T05:31:39+5:302017-02-20T05:31:39+5:30
डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी पूर्व विभागातर्फे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
डोंबिवली : डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी पूर्व विभागातर्फे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मध्यवर्ती काँग्रेस कमिटी कार्यालयाजवळून लेझीम पथकांसह वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये आरबीटी स्कूलच्या ५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. भाजी मार्केट, बाजीप्रभू चौक, केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय, शिवाजी पुतळा, कॅनरा बँकेकडून ही मिरवणूक पुन्हा कार्यालयाजवळ आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराजांचे पोवाडे सादर करण्यात आले. यावेळी ‘अ’ ब्लॉक अध्यक्ष गंगाराम शेलार, ‘ब’ ब्लॉक अध्यक्ष रमेशचंद्र जैन, उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षद पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवाजी चौक, कल्याण येथील पुतळ्यास आणि महापालिका मुख्यालय येथे महाराज यांच्या प्रतिमेस महापौर राजेंद्र देवळेकर, पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त दीपक पाटील, नितीन नार्वेकर, पालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता यशवंत सोनोने, प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे उपस्थित होते. तसेच दुर्गामाता चौक येथेदेखील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला.
डोंबिवलीत सभागृहनेते राजेश मोरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी ई प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार, फ प्रभागाच्या अधिकारी श्वेता सिंगासने उपस्थित होत्या. शिवनिष्ठ सेवा तरुण मंडळातर्फे बाइक रॅली काढली. ५० बाइक या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. वसंत व्हॅली येथून या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर, ती आधारवाडी चौक, लालचौकी अशी फिरून तिचा शिवाजी चौकात समारोप झाला. शिवप्रेमींनी भगवे फेटे परिधान केले होते. (प्रतिनिधी)
कोळसेवाडीत नाटकाचे सादरीकरण
कल्याण (पू.) सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या इतिहासात प्रथमच प्रचंड पोलीस बंदोबस्तात ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे सादरीकरण झाले. दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर या वेळी प्रचंड गर्दी होती. दंगलविरोधी पथक, गस्ती पथकांच्या गाड्या असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण होते.