समस्यांचे आगार असलेले कल्याण-डोंबिवली म्हणे स्मार्ट!

By admin | Published: December 7, 2015 01:00 AM2015-12-07T01:00:23+5:302015-12-07T01:00:23+5:30

कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांची समस्यांमधून सुटका होत नाही. रेल्वेचा प्रवास असो की रस्ता वाहतूक. भाजी मंडई असो की रस्त्यारस्त्यांवरील फेरीवाले

Kalyan-Dombivali, which is having problems, is smart! | समस्यांचे आगार असलेले कल्याण-डोंबिवली म्हणे स्मार्ट!

समस्यांचे आगार असलेले कल्याण-डोंबिवली म्हणे स्मार्ट!

Next

कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांची समस्यांमधून सुटका होत नाही. रेल्वेचा प्रवास असो की रस्ता वाहतूक. भाजी मंडई असो की रस्त्यारस्त्यांवरील फेरीवाले. पाणीटंचाई असो की टँकर लॉबीची मनमानी. स्वच्छतागृहांची दैनावस्था असो की हगणदारीमुक्त शहर-गाव अभियानाचा फार्स. कचऱ्याचा प्रश्न जटील आहे. प्रदूषणामुळे नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात आले आहे. सायलेंट झोनची ऐशीतैशी. महापालिका शाळांमधील भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड. डॉक्टरांसह अद्ययावत तंत्रप्रणालीमुळे महापालिकेची इस्पितळे व्हेंटिलेटवर. सीसी कॅमेरे शोभेचे बाहुले, त्यामुळे सुरक्षा ऐरणीवर आहे. मनोरंजन, विरंगुळा हे शब्द केवळ शब्दकोशातच आहेत. कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. शहरांमध्ये सिग्नल व्यवस्था इतिहासजमा त्यामुळे दिवसेंदिवस अपघात, वाहतूककोंडी, वाहनचालकांचा स्वैराचार सुुरू आहे. रिक्षाचालकांची मनमानी-मुजोरी हरघडी अनुभवाला येत आहे. महापालिका अधिकाऱ्यांचा ढिम्म कारभार उबग आणणारा आहे.
आयुष्याची पुंजी एकत्र करून आणि उर्वरित आयुष्य कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी बांधून घेत या ठिकाणी सर्वसामान्य चाकरमानी कसेबसे घर घेतात. पैसे गुंतवल्यावर त्यांना समजते की, आपण राहतो आहोत ती जागा अनधिकृत आहे. त्यामुळे अशा नागरिकांच्या डोक्यावर जीवनभर टांगती तलवार राहते. अशा दडपणात मार्ग काढत असतानाच दिवसाढवळ्या येथील रामनगर, टिळकनगर, विष्णुनगर, मानपाडा, कोळसेवाडी, महात्मा फुलेनगर, बाजारपेठ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून महिलांच्या अंगावर हात टाकून त्यांचे मौल्यवान दागिने लंपास केले जाते. पोलीस यंत्रणेच्या हातावर तुरी देत या घटना वाढत आहेत. यंत्रणा मात्र तोंडदेखली कारवाई करण्यासाठी कधी इराणी वस्तीत कोम्बिंग आॅपरेशन करते तर कधी नाकाबंदीसारखे उपक्रम करत चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यात वेळ दवडत असल्याची टीका होत आहे. पाणी हे जीवन असे असताना या ठिकाणी प्रतिदिन ३५० एमएलडी पाणी लागते. त्यातील पाणीगळतीचे प्रमाण २००८ च्या निकषांनुसार २१.५० टक्के आहे. त्यात आता निश्चितच वाढ झालेली आहे. सरासरी ३० टककयांहून अधिक पाणीगळती होत असेल तर पाटबंधारे खात्याकडून आलेली कपात आणि पाण्याचे नियोजन करण्यामध्ये महापालिका यशस्वी झाली आहे का? गेल्या दोन निवडणुकांपासून सत्ताधारी शिवसेनेने आठवडाभर चोवीस तास पाणी हे आश्वासन दिले. मात्र ते अस्तित्वात आले नाही. त्यामुळेच या शहरांना सप्टेंबर अखेरीसपासून ३० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे.
कचऱ्याची समस्या जटील असून न्यायालयाने फटकारले आहे. मात्र तरीही शहाणपण सुचत नसून केवळ प्रकल्प पाहणीसाठी वेळ दवडण्यात येत आहे. महापालिका कागदोपत्री कायद्याचे पालन करत कोणतीही परवानगी देत नसली तरीही शहरांमध्ये सर्रासपणे बांधकामे सुरू आहेत. त्यात विशेषत: २७ गावांसह डोंबिवली शहरातील खाडीकिनारे, कोपर पूर्वेचा परिसर येथे जोमाने बांधकामे होत आहेत. मात्र या ठिकाणचे वॉर्ड आॅफिसर आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणारी यंत्रणा यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे सारे काही आलबेल असल्याचा आविर्भाव आणला जात आहे.
एकीकडे हगणदारीमुक्तचा नारा, त्यातच शौचालय नसतील तर लोकप्रतिनिधी होता येणार नाही, अशी स्थिती असतानाच कल्याण-डोंबिवलीतील ४५ हून अधिक दलित वस्त्यांमधील स्वच्छतागृहांची दैनावस्था बघण्यासाठी आयुक्त, महापौर आणि उपमहापौर यांना वेळ नाही, किंबहुना एवढ्या वस्त्या असतील, त्यांचे लोकेशन आणि माहितीही आहे की नाही, हा संशोधनाचा भाग आहे. त्या वस्त्या सुधारणांसाठी विशेष निधी देण्यात आला आहे. या आधी तो नव्हता का, याची खातरजमा प्रसिद्धिमाध्यमांनी केलेली नाही. तो निधी असतोच त्यासाठी स्वतंत्र ‘हेड’ असतो, संबंधित महापालिका-नगरपरिषदांकडे तो असतो. त्याची अंमलबजावणी किती झाली? त्याचे काय झाले ? ही वस्तुस्थिती अभ्यासण्यासाठी डोंबिवलीतील इंदिरानगर, क्रांतीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत आदी वस्तींत डोकावले की वास्तव समोर येते. ही बकाल अवस्था होण्यासाठी त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत की, महापालिकेची यंत्रणा, की तेथील अन्याय सहन करणारा नागरिक यावर भाष्य करणे सर्वच जण टाळतात, हीदेखील सुशिक्षितांच्या नगरीतील शोकांतिका आहे.
रेल्वे प्रवासात शहरातील युवकाचा अपघाती मृत्यू होतो. त्यासाठी विविध प्रवासी संघटनांसह स्थानिक आमदार-लोकप्रतिनिधी एकत्र येत रेल्वेचा निषेध करतात. परंतु त्या वेळेसह काही स्मार्ट नागरिकांनी हे तर रोजचेच आहे, लोकप्रतिनिधींना आता जाग आली का? असा सवाल केला. मात्र, अशा घटना रोज होत असतील तर त्या सहन करतच प्रवास करायचा, ही कोणती मानसिकता आहे. घरात पाणी आले नाही, अथवा कर्त्याने घरात पैसे दिले नाहीत यासह एवढ्या तेवढ्या कारणाने रणकंदन माजवणारे नागरिक एखाद्याचा मृत्यू झाला तरी भावनाशून्यपणे रोज मरे त्याला कोण रडे, असे म्हणत मार्गस्थ कसे काय होतात? समाजातील संवदेनशीलता, माणुसकी संपली का? आदी सवाल उपस्थित होत आहेत.

Web Title: Kalyan-Dombivali, which is having problems, is smart!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.