कल्याण-डोंबिवलीत घरफोड्यांचे सत्र; लाखोंचा ऐवज लंपास तर रहिवाशांमध्ये भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 01:03 AM2019-06-02T01:03:49+5:302019-06-02T01:04:13+5:30
कल्याण-डोंबिवली शहरांत तीन ठिकाणी घरफोड्या, तर दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांत काही महिन्यांपासून घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. बंद असलेली घरे हेरून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास करण्याचा सपाटा काही महिन्यांपासून सुरूच ठेवला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांत तीन ठिकाणी घरफोड्या, तर दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पूर्वेतील राजाजी पथ परिसरात असलेल्या आशीर्वाद इमारतीमध्ये राहणारे हिमांशू भोसले यांची आई बुधवारी रात्री घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी वाई येथे गेल्या होत्या. तर, हिमांशू नातेवाइकांकडे राहायला गेला होता. त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील एक लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. शुक्रवारी घरी परतल्यानंतर हिमांशू यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घरफोडीची दुसरी घटना मंगळवारी भरदिवसा घडली. पूर्वेतील स्टार कॉलनी येथील साईसृष्टी इमारतीत राहणारे दीपक भरीवार (४४) हे मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास राहत्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी भरीवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तिसरी घटना कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता मंदिर परिसरात घडली. गंगोत्री अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रतीक प्रधान (२८) हे आईवडिलांसह वाडेघर येथे राहणाऱ्या चुलत भावाकडे बुधवारी सायंकाळी राहायला गेले होते. यावेळी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी असा एक लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवली पश्चिमेत दोन ठिकाणी चोरी
महालक्ष्मी कृपा इमारतीमध्ये राहणारे पराग थोरात (३५) यांच्या घराच्या उघड्या खिडकीवाटे प्रवेश करत चोरट्यांनी घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना गुरुवारी रात्री ११ ते शुक्रवारी सकाळी ६ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मोठागाव परिसरात असलेल्या काप्रोबा दर्शन चाळीत राहणाºया कांचन देवकुळे (४९) यांच्या घरातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना गुरुवारी रात्री ११ ते शुक्रवारी सकाळी १० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी देवकुळे यांनी विक्रांत लाड याच्याविरोधात संशय व्यक्त करत विष्णूनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे.