कल्याण-डोंबिवलीला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 03:43 AM2018-07-08T03:43:10+5:302018-07-08T03:43:35+5:30
कल्याण-डोंबिवली शहरांत शनिवारी पहाटेपासूनच कोसळणाऱ्या धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले.
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत शनिवारी पहाटेपासूनच कोसळणाऱ्या धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे शहरे जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरले, तर नाले तुडुंब भरून वाहू लागले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली.
कल्याण स्थानक परिसर, शिवाजी चौक, महमंद अली चौकात पाणी साचले. लक्ष्मी भाजीमार्केटमध्ये दोन फूट पाणी होते. त्यामुळे माल भिजल्याने व्यापाºयांचे नुकसान झाले. पाण्यातूनच व्यापारी आणि ग्राहकांना वाट काढावी लागली. जमिनीखालचा भाग खचल्याने लक्ष्मी भाजी मार्केट परिसरासमोरील एका दुकानासमोर रस्त्याला मोठा खड्डा पडला. गुरुदेव हॉटेलमागील जुन्या आरटीओ कार्यालयानजीक असलेल्या चाळीतील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांच्या गृहोपयोगी वस्तू पाण्यात भिजल्या. घरातील सामान काढून नागरिकांना बाहेरची वाट धरावी लागली. संतोषीमाता रोड परिसरातील राम मंदिर रोड, एव्हरेस्ट सोसायटीच्या घरात व चाळीत पाणी भरले. त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी कविता लोखंडे यांनी केला. आंबेडकर रोड जलमय झाल्याने वाहनचालकांना त्यातून वाट काढावी लागली.
कल्याण-मुरबाड रोडवरील शहाड पुलानजीक अडीच फूट पाणी होते. तर, बिर्ला कॉलेज परिसरातही तळे साचले. काळातलाव पाण्याने तुडुंब भरल्याने तलावातील पाणी रस्त्यावर वाहू लागले होते. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातही दोन फूट पाणी तुंबले.
कल्याण पूर्वेतील आडिवली-ढोकळी, नांदिवली या परिसरांत सखल भागांत पाणी साचले. तीन फूट पाण्यातून नागरिकांना मार्गक्रमण करावे लागले. डोंबिवली स्टेशन परिसरात साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना पायपीट करावी लागली. स्टेशन परिसरातील दुकानांत पावसाचे पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. शिव मंदिर रोड परिसरातही पाणी होते. नाल्याला पडलेले भगदाड नागरिकांनी तक्रारी करूनही न बुजवल्याने शनिवारी पावसामुळे पुन्हा डोंबिवलीतील मिलापनगर व सुदर्शननगर परिसर जलमय झाला. एम्स रुग्णालय, आजदे परिसरात दोन फूट पाणी होते. कावेरी चौकातील नाल्याची स्वच्छता न झाल्याने चौक जलमय झाला होता. सागाव व सागर्ली येथील घरांमध्ये पाणी साचले.
१५ ठिकाणी पडली झाडे
च्कल्याण-डोंबिवली परिसरांत २४ तासांत १०० मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात १५ ठिकाणी झाडे पडली. मात्र, त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
च्डोंबिवली स्टेशन परिसरातील पाण्याचा निचरा दुपारी १ वाजता करण्यात आला. पाणी साचल्याच्या तक्रारी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडे आल्या होत्या. त्यांचे निवारण केल्याने महापालिकेतर्फे सांगण्यात आले.
अंगावर पडला विजेचा खांब
नांदिवली परिसरातील मुस्कान राजूरिया (१७) या मुलीच्या अंगावर वीज वितरण कंपनीचा पोल पडला. त्यामुळे ती जखमी झाली आहे. तिला महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कल्याण-मलंग रोडचे रुंदीकरण केले असले, तरी रस्त्यातील खांब तसेच ठेवले आहेत. त्याकडे महापालिका व महावितरण कंपनी या दोन्ही सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शाळेत केली व्यवस्था
नदी, खाडीकिनारी असलेल्या नागरिकांच्या घरांत पाणी शिरल्याने त्यांची व्यवस्था शाळेतील संक्रमण शिबिरात केली आहे. तसेच अन्नाची पाकिटेही देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ठाण्यात जोरदार सरी
ठाणे : मागील काही दिवस रिपरिप सुरू असलेल्या पावसाने शनिवारी सकाळपासून जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तर, वाहतुकीचा वेगही काहीसा मंदावला होता. सायंकाळपर्यंत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस बरसला. शहरात अनेक ठिकाणी वृक्ष पडणे, मुंब्य्रात नाल्याची भिंत पडण्याची घटना घडली.
शहरातील वागळे इस्टेट परिसर, महापालिका मुख्यालयमार्ग, नितीन कंपनी रस्ता, हरिनिवास, नौैपाडा, मल्हार सिनेमा परिसर, नौपाड्यातील कल्पना सोसायटी, घोडबंदर येथील कापूरबावडीनाका, पातलीपाडानाका, डी मार्ट परिसर या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. कोपरीतही मयूर सोसायटीत पाणी शिरले होते. त्यासाठी आपत्कालीन विभागामार्फत पंप पाठवण्यात आला होता. तसेच श्रीनगर, शांतीनगर तसेच शहरातील इतर भागांतील नालेदेखील दुथडी भरून वाहत होते. मुंब्य्रातील संतोषनगर भागातील नाल्याची भिंत कोसळल्याची घटना घडली. तर, शहरातील आठ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. मुंब्रा येथील केदार पॅलेस, नुरानी हॉटेल, कौसागाव, बाजार, रशीद कम्पाउंड, चर्नीपाडा, देवरीपाडा या भागात पाणी साचले होते.
भातशेती पाण्याखाली
चिकणघर : पावसामुळे गौरीपाडा परिसरातील नुकतीच लागवड झालेली भातशेती पाण्याखाली गेली. यंदा वेळेवर भातपेरणी झाली. त्यामुळे शेतकºयांनी मागील आठवड्यात भातलावणीची कामे पूर्ण केली. परंतु, शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे ही रोपे वाहून जाण्याची भीती शेतकरी प्रभाकर म्हात्रे यांनी वर्तवली.
खडवली नदीत अडकलेल्या दोघांची सुटका
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील भातसा, काळू आणि बारवी या नद्यांना पूर आला आहे. नदीलगतच्या वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले. खडवली येथील भातसा नदीपात्रात एकनाथ रोठे (रा. वेढे, ता. भिवंडी) आणि कैलास पांचाळ (रा. शंकर मंदिर, खडवली) हे अडकले होते. दोराच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे, तहसीलदार अमित सानप यांच्या पथकाला यश आले.
काळू नदीलाही पूर आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रुंदे गावाजवळ असणारा काळू नदीवरील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामुळे तेथील १० ते १२ गावांचा टिटवाळ्याशी संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारवी नदीला पूर आल्याने दहागाव येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. परिणामी, दहागाव, पोई, आपटी व मांजर्ली या गावांचा बदलापूरशी संपर्क तुटला आहे. कामानिमित्त बदलापूरला गेलेले तेथेच अडकले आहेत.
दोन दिवसांपूर्वी शेतकºयांनी भातलावणीला सुरु वात केली होती. परंतु, शेतीत पुराचे पाणी शिरल्याने ही कामे खोळंबली आहेत. टिटवाळा स्थानक ते गणपती मंदिर या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील जलाराम नाल्याचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे बँक आॅफ बडोदासमोर गटाराचे पाणी तुंबले.
वासुंद्री गावालगत काळू नदीवरील श्री महाकालेश्वर मंदिर परिसरातील नदीपात्र तुडुंब भरून वाहत आहे. पाऊस वाढल्यास मांडा, कोंढेरी, वासुंद्री, सांगोडा या गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. टिटवाळा शहरातही ठिकठिकाणी गटाराचे पाणी साचले. मोहिलीतील पंपगृह पुरामुळे बाधित झाले आहे. पाणी ओसरल्याशिवाय टिटवाळा, मोहिली, बल्याणी, उंभार्ली भागाला पाणीपुरवठा होणार नाही, असे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.
चाळींमध्ये शिरले पाणी
कोळसेवाडी : मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील सखल भाग जलमय झाला. अनेक चाळींमध्ये पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांचे अतोनात हाल झाले. केडीएमसीच्या ‘ड’ आणि ‘जे’ प्रभागांतील कर्मचाºयांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या कार्यालाही मर्यादा आल्या.
कल्याण पूर्वेला रेल्वेस्थानक परिसरातील दोन्ही बोगद्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे प्रवाशांना त्यातून वाट काढावी लागली. मंगल राघोनगरमधील गटारातील कचºयाचा निचरा न झाल्याने तेथे पाणी साचले. अजिंक्यतारा चाळीतील काही घरांमध्ये पाणी शिरले. तिसगाव येथील तिसाई मंदिर परिसरातील तलावामागील जीवनछाया, पुंडलिक कॉलनी, त्रिमूर्तीनगर येथील सखल भागातील चाळींमध्ये गुडघाभर पाणी होते. संतोषनगर नाल्यामध्ये लोकग्राममधून झाड वाहून आले होते. ते जेसीबीद्वारे बाजूला केल्यानंतर प्रवाह सुरू झाला.
खडेगोळवली येथील महेश कॉलनी, मनीषा कॉलनी, आकाशदीप, पंचवटी, पार्वतीनगर, गंगाविहार येथील चाळींमध्ये पाणी शिरले. कमलादेवी कॉलेजजवळील आदर्श कॉलनीतील गटारे तुंबल्यामुळे चाळींमध्ये पाणी शिरले होते. श्रीमलंगपट्टी भागातील एका भागामागील चाळीही जलमय झाल्या होत्या. टेकडीवरील पाणी वाहत आल्याने कचोरे परिसरातील चाळींमध्ये पाणी होते.