कल्याण-डोंबिवलीत हेल्मेट सक्ती, १२ मार्चपासून होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 05:57 PM2018-03-05T17:57:29+5:302018-03-05T17:57:29+5:30
दुचाकी अपघातात जखमींसह मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने किमान दुचाकीस्वारांनी तरी हेल्मेट घालावे असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण विभागाने केले आहे.
डोंबिवली: दुचाकी अपघातात जखमींसह मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने किमान दुचाकीस्वारांनी तरी हेल्मेट घालावे असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण विभागाने केले आहे. त्यासाठी १२ मार्चपासून कल्याण-डोंबिवलीत हेल्मेट सक्ती करण्यात आली असून ते न घालणा-या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
डोंबिवली वाहतूक पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे यांनी ही माहिती दिली. रविवारी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी ही माहिती देत सांगितले की, एखाद् वेळेस जबर अपघातात दुचाकी स्वाराला हेल्मेट असेल तर जीव वाचू शकतो, त्यामुळे दुचाकीस्वारांनी स्वत:हून हेल्मेट घालावे आणि स्वत:चा जीव वाचवावा असे आवाहन त्यांनी केले. तसे न केल्यास ५०० रुपये दंड होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कल्याण वाहतूक पोलिस विभाग सहाय्यक उपायुक्त बाबासाहेब आव्हाड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.