कल्याण-डोंबिवली महापौर निवडणूक : शिवसेनेत जातीवरून भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:32 AM2018-05-10T06:32:49+5:302018-05-10T06:32:49+5:30
ज्या आगरी कार्डाभोवती कल्याण-डोंबिवलीचे राजकारण फिरते, त्या समाजाला महापौर, उपमहापौर निवडणुकीत स्थान न मिळाल्याची नाराजी बुधवारी शिवसेनेतून उफाळून आली.
कल्याण - ज्या आगरी कार्डाभोवती कल्याण-डोंबिवलीचे राजकारण फिरते, त्या समाजाला महापौर, उपमहापौर निवडणुकीत स्थान न मिळाल्याची नाराजी बुधवारी शिवसेनेतून उफाळून आली. त्याचे बाचाबाचीत रूपांतर झाल्याने शिवसेनेत जातीपातील, गटबाजीला थारा नाही, अशी समज अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीररित्या द्यावी लागली.
महापौर व उमहापौरपदाची बिनविरोध निवड घोषणा होताच शिवसेनेच्या काही नगरसेविकांनी आगरी समजाला पक्षाने न्याय दिला नाही, अशी कडवट टीका करत आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली. त्यावरून नगरसेविका शालिनी वायले आणि वैजयंती घोलप यांच्यात शाब्दिक चकमक झडली. शिवसेनेत जातीभेदाच्या राजकारणाला थारा नाही. त्यामुळे शब्द मागे घ्या, असा आग्रह करत घोलप प्रचंड संतापल्या. एकंदर वातावरण पाहून ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी ‘जे काही झाले आहे, ते योग्यच झाले आहे. त्यामुळे शांततेने घ्या,’ असे आवाहन केले. तेव्हा कुठे घोलप यांचा पारा उतरला.
या वादाविषयी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता असा कोणता वाद झाल्याचे मला माहीत नाही, असे त्यांनी सांगितले.
नंतर तेथे आलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची या घटनेवर प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी शिवसेनेत जातीपातीला व गटबाजीला थारा नाही, असे सांगत हा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. यंदाचे महापौरपद खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित होते. त्यानुसार राणे यांना महापौरपद दिले आहे, असे सांगत त्यांनी पक्षाच्या या निर्णयाचे समर्थन केले.
नेत्यांतील मनोमीलनाची रंगली चर्चा
ठाणे जिल्ह्यातील अन्य महापालिका किंवा नगरपालिकांत शिवसेना-भाजपामध्ये जेवढे मधूर संबंध नाहीत, तेवढे कल्याण-डोंबिवलीत दिसून येत आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील ट्युनिंग याला कारणीभूत असल्याचे मानले जाते. वस्तुत: या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले होते.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ढाण्या वाघाच्या उपमेतून भाजपावर हल्ला केल्याने मुख्यमंत्र्यांनी वाघाच्या जबड्यात हात घालणारी आमची सिंहाची जात असल्याचे प्रत्त्युत्तर दिले होते. नंतरही भाजपाकडे खास करून मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याकडून पोलिसांचा वापर करून शिवसेनेला टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद सोडल्याची भावनिक घोषणा करून शिवसैनिकांत चैतन्य जागवले होते. मात्र नंतर सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले.
परस्परांवर कुरघोडीची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नसले, तरी ठरल्यानुसार त्यांनी आजवर परस्परांना सत्तेतील पदे दिली आहेत. उल्हासनगरमध्ये भाजपातील कुरबुरी वाढल्याने शिवसेनेने सोबत यावे यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू होते. तेथील सत्तेची गणिते जुळवण्यासाठी भाजपाने महापौरपद सोडल्याने शिवसेनेच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यातही गेल्या अडीच वर्षांतील आर्थिक कोंडी दूर होऊन आता निधी येण्याचा मार्ग खुला होणार असल्याने हा आनंद द्विगुणित झाला आहे.
मी हाय कोली...
उपमहापौरपदी बिनविरोध निवड झालेल्या भोईर या कोळी समाजाच्या आहेत. त्यामुळे त्यांची दोन मुले, तसेच महिला, पुरुष कार्यकर्ते कोळी समाजाच्या पारंपरिक वेषभूषेत आले होते. त्यांनी सर्वांना लाल टोपी घातली. मुलांच्या शर्टावर ‘मी हाय कोली,’ असे लिहिलेले होेते.
भाजपाच्या मनीषा धात्रक नाराज
सत्तेच्या करारानुसार भाजपाला यावेळी महापौरपदाची आस होती. भाजपाच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन महापौरपदावरील दावा सोडला. त्यामुळे भाजपामधून इच्छुक असलेल्या मनीषा धात्रक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने अडीच वर्षांत त्यांना कोणतेही पद दिलेले नाही. धात्रक यांची नगरसेविकापदाची ही दुसरी टर्म आहे.
२७ गावांतील पाणीप्रश्न
सोडवणार : विनीता राणे
२०१५ मध्ये महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्यापासून मी २७ गावांतील पाणीप्रश्नाविषयी ऐकत आहे. हा प्रश्न सोडवण्यास मी प्राधान्य देणार आहे. तसेच शहरात विविध विकासकामे करणार आहे. प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचा मानस नवनिर्वाचित महापौर विनीता राणे यांनी व्यक्त केला.
टिटवाळ्याच्या विकासाला प्राधान्य : उपेक्षा भोईर
२७ गावांतील पाणीप्रश्न गंभीर आहेच. मात्र, माझ्या मांडा-टिटवाळा परिसराकडे आजवर महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या परिसराच्या समस्या सोडवण्यास मी प्रथम प्राधान्य देणार आहे, असे नवनिर्वाचित उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी सांगितले.
राणे १३ व्या महापौर
महापालिकेत १९९५ पासून आजपर्यंत १२ जणांनी महापौरपद भूषवले आहे. राणे या १३ व्या महापौर आहेत. यापूर्वी आरती मोकल, शरयू प्रधान, अनिता दळवी, मंगल शिंदे, वैजयंती घोलप आणि कल्याणी पाटील या महिलांनी महापौरपद भूषवले आहे. या सर्व नगरसेविका शिवसेनेच्या होत्या. आता पुन्हा शिवसेनेच्या नगरसेविका विनीता राणे यांना महापौरपद मिळाले आहे.
दोन्ही पदे महिलांकडे
भाजपाने यापूर्वी २००१ मध्ये वनिता पाटील यांना उपमहापौरपदाची संधी दिली होती. त्यानंतर नगरसेविकेचा उपमहापौरपदासाठी विचार झाला नव्हता. १५ वर्षांनी उपमहापौरपदाची संधी भाजपाच्या उपेक्षा भोईर यांना मिळाली आहे. यापूर्वी महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे ही एकाच वेळी महिलांकडे नव्हती. तो योग यावेळी जुळून आला आहे.