कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पुन्हा प्रशासकीय प्रशिक्षणासाठी बंगळुरुला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 05:50 PM2017-10-09T17:50:36+5:302017-10-09T17:50:52+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू हे प्रशासकीय प्रशिक्षणासाठी बंगळुरुला गेले आहे. प्रशिक्षण काळ हा दहा दिवसांचा असून दहा दिवसानंतर वेलरासू कल्याण डोंबिवलीत परतणार आहे.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू हे प्रशासकीय प्रशिक्षणासाठी बंगळुरुला गेले आहे. प्रशिक्षण काळ हा दहा दिवसांचा असून दहा दिवसानंतर वेलरासू कल्याण डोंबिवलीत परतणार आहे. दरम्यान, वेलरासू यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे देण्यात आला आहे.
महापालिकेचे आयुक्त ई. रविंद्रन यांच्या बदलीपूर्वी रविंद्रन यांना निवडमूक निरिक्षक म्हणून पंजाबला पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे भिवंडी महापालिकेचा अतिरिक्त पदभार स्वीकारला होता. त्यांना महापालिकेच्या कामकाजासाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. अनेकदा मंत्रालय, एमएमआरडीए आणि उच्च न्यायालयातील तारखांमुळे त्यांनाही नागरिकांसाठी वेळ देता आला नाही. तरी देखील त्यांनी काही काळ लोकशाही दिन अत्यंत चांगल्या प्रकारे चालविला होता. रविंद्रन यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागी वेलरासू यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. वेलरासू यांनी आयुक्तपदाचा कार्यभार घेताच एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी त्यांना तातडीने जावे लागले. पुन्हा महापालिका एक महिना आयुक्ताविना होती. त्यामुळे महापालिकेच्या व्यथा मांडायच्या कुणाकडे असा प्रश्न सदस्यांसह नागरिकांना पडला होता. एक महिन्याच्या प्रशिक्षणानंतर वेलरासू परतले. त्यांनी 90 दिवस महापालिकेचा कारभार पाहिला असे त्यांनी स्वत: नुकत्याच पार पडलेल्या महासभेत स्पष्ट केले. 90 दिवसांच्या कारभानंतर त्यांना दहा दिवसाच्या प्रशासकीय प्रशिक्षणासाठी जावे लागले आहे. दहा दिवसांच्या प्रशिक्षणानंतर वेलरासू 20 ऑक्टोबरनंतर परततील असा अंदाज आहे. त्यांच्या सारखे प्रशासकीय प्रशिक्षणाच्या दौ-यावर जाण्याविषयी सदस्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. दरम्यान, दहा दिवस आयुक्त पदाचा प्रभारी पदभार अतिरिक्त आयुक्त घरत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.