कल्याण-डोंबिवली परिवहनची टिटवाळा स्टेशन ते महागणेश मंदिर सेवा बंद
By अनिकेत घमंडी | Published: November 29, 2017 06:23 PM2017-11-29T18:23:44+5:302017-11-29T18:36:32+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असतांना नव्याने सुरु केलेली बससेवा बंद करण्यात आली
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असतांना नव्याने सुरु केलेली बससेवा बंद करण्यात आली आहे.
परिवहन विभाग तोट्यात असतांनाच सेवा बंद होणे योग्य नसल्याचे सभापती संजय पावशे यांनी प्रशासन अधिका-यांना म्हंटले. जर टिटवाळा स्थानकापर्यंत बस जात असेल तर ती पुढे गणपती मंदिरापर्यंत नेण्यात यावी, जेणेकरुन ज्यांना रिक्षेने जाणे परवडत नाही त्यांना सुविधा मिळेल. नागरिकांना सुविधा द्या, जेणेकरुन उत्पन्न वाढेल असा सकारात्मक विचार करा असेही त्यांनी कर्मचा-यांना सांगितले. एकदम एखादी सेवा बंद करण्याआगोदर चर्चा करा असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही ही सेवा बंद झाल्याचे सांगत दुसरा पर्याय असल्याचे स्पष्ट केले. टिटवाळा स्टेशन ते सांगोडा अशा मार्गावर सध्या बस जाते, ती बस गणेशमंदिर मार्गे नेता येऊ शकते, असेही ते म्हणाले. त्यासाठी संबंधित अधिका-यांशी चर्चा केली असून दोन दिवसात तो बदल करण्यात येईल असेही टेकाळे म्हणाले.
सभापती संजय पावशेंचे १० लाखांचे उद्दीष्ठ!
एकीकडे सभापती संजय पावशे यांचे परिवहन सेवेचे प्रतीदिन उत्पन्न १० लाख करण्याचा उद्देश आहे. सध्या केडीएमटी सुमारे ८० बस सेवेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुविधा देते. एका खासगी कंपनीला ज्या १०० बस मध्ये तांत्रिक बिघाड झाले आहे त्याची तातडीने दुरुस्ती करणे, त्या बस नव्या करणे यासंदर्भात सूचित केले आहे. लवकरच त्या बसेस सेवेत येतील. सध्या उपलब्ध असणा-या सुविधांमधून सुमारे ६ लाखांच्या प्रतीदिन उलाढालीपर्यंत उद्दीष्ट गाठण्यास सफलता मिळाली आहे. जर त्या १०० बस आल्या तर मात्र उर्वरीत ४ लाखांचे उद्दीष्ठ निश्चित गाठले जाऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एखाद वेळेस बस उपलब्ध होतील, पण रुट बंद पडत गेले तर काय उपयोग असा सवाल प्रवाशांनी केला.