कल्याण-डोंबिवलीकरांनी केली योगसाधना; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:42 PM2019-06-21T23:42:53+5:302019-06-21T23:43:15+5:30
शाळा, संस्थांतर्फे विविध ठिकाणी जागृती
डोंबिवली : जागतिक योग दिन शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत उत्साहात साजरा झाला. शहरांतील विविध शाळांमधील विद्यार्थी, योगासनांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मानपाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनीही योगासने करत सुदृढ आरोग्य राखण्याचा निश्चय केला.
जायंट्स ग्रुप आॅफ कल्याणतर्फे योग दिन साजरा झाला. अखिल भारतीय कला, क्र ीडा व सांस्कृतिक अकादमीच्या संस्थापिका व योग शिक्षिका साक्षी परब यांनी सूर्यनमस्कार व प्राणायाम यांची माहिती देत उपस्थितांकडून त्याचा सराव करून घेतला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समुपदेशक प्रा. दिनेश गुप्ता यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगासनांचे फायदे सांगितले. संकल्प इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी रक्षा शिंदे, अर्पिता जयस्वाल, चिराग गजोरा यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. अक्षरमंच प्रकाशनतर्फे प्रा. गुप्ता लिखित ‘दैनिक जीवन मे भगवद्गीता’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले. डॉ. योगेश जोशी यांच्या हस्ते प्रा. गुप्ता यांना ‘योग आचार्य’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले. हेमंत नेहेते, उमेश आणि वैशाली बत्तलवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्र मावेळी यतीन गुजराथी, रामदास डोईफोडे आणि सुगंधा परब आदी मान्यवर उपस्थित होते.
डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णूनगर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका सुनंदा बेडसे यांनी श्री अंबिका योगनिकेतनच्या योग शिक्षकांना आमंत्रित केले होते. विद्यार्थ्यांना त्यांनी योगसाधनेचे महत्त्व सांगितले. त्यानंतर प्रार्थना, शांतीपाठ, प्राणायाम, योगासने व सूर्यनमस्कार, असे विविध प्रकार ९०० विद्यार्थी व शिक्षकांनी केले. शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांची योगासने, सूर्यनमस्कार या प्रकारांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच ओमकार ध्यानधारणाही विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. तर, शाळेच्या दत्तनगर शाखेत विद्यार्थ्यांकडून योगप्रार्थना, प्रात्यक्षिके, आसने करून घेण्यात आली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन देवश्री इनामदार व नंदन कार्लेकर या विद्यार्थ्यांनी केले. शाळेच्या गोपाळनगर शाखेत इयत्ता सातवी ते नववीतील निवडक विद्यार्थ्यांनी योगासने सादर केली. यावेळी विवेकानंद केंद्रातील शिक्षकांनी योगासने तसेच एकाग्रता वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत, याची माहिती दिली. शिक्षिका मोनिका पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली. याशिवाय, ओमकार इंटरनॅशनल स्कूल, मातोश्री सरलाबाई म्हात्रे विद्यालय, जनगणमन शाळेमध्येही योग दिन साजरा झाला. काही शाळांनी डोंबिवली क्रीडासंकुल व डोंबिवली जिमखाना येथे योगासने केली. पतंजली आणि योग विद्याधाम या संस्थांनीही योगासनांचे कार्यक्रम घेतले.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार नरेंद्र पवार यांच्यातर्फे ४० ठिकाणी योगासनांचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात एक हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी काही ठिकाणी पवार यांनीही स्वत: सहभाग घेऊन योगासने केली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चित्रकला, प्रश्नमंजूषा स्पर्धा : टिळकनगर शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी योगासनांवर आधारित चित्रकला स्पर्धा, तर इयत्ता आठवी ते दहावीसाठी लेखी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली.
दिव्यांग मुलांमध्येही उत्साह : ‘रोटरी स्कूल फॉर डेफ’चे १२५ विद्यार्थी, महाविद्यालयाचे ७० विद्यार्थी, कर्मचारी यांनी मुख्याध्यापिका अपेक्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली. संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी रोटरी सेवा केंद्राचे अध्यक्ष ओमप्रकाश धूत उपस्थित होते. शाळेतील शिक्षक अमोल ठेंगे यांनी विद्यार्थ्यांना योगासने व योगमुद्रांची शास्त्रीय माहिती दिली.