कल्याण-डोंबिवलीकरांची ‘पूलकोंडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:44 AM2019-05-26T00:44:23+5:302019-05-26T00:44:26+5:30
कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये काही पुलांची कामे सुरू आहेत. काही पूल पाडण्यात आले आहेत, तर काहींचे काम अर्धवट आहे.
मुरलीधर भवार
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये काही पुलांची कामे सुरू आहेत. काही पूल पाडण्यात आले आहेत, तर काहींचे काम अर्धवट आहे. त्यातच, काही पूल बंद करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. पूल वाहतूक आणि रहदारीसाठी बंद केले जात असल्याने नागरिकांची पूलकोंडी झाली आहे. पूल वेळेत मार्गी लागत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच लक्ष्य केले आहे.
डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर दिशेचा रेल्वे उड्डाणपूल २७ मे पासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याला महापालिका अनुकूल नाही. महापालिकेने पूल बंद केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्याय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कल्याण-शीळ रस्त्यावरील सगळ्यात महत्त्वाचा असलेला जुना ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक असल्याने तो नोव्हेंबर २०१८ मध्ये पाडला. त्याच्या कामाला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेजारील अरुंद पुलावरून वाहतूक कशीबशी सुरू आहे.
कल्याण रेल्वेस्थानकातील लोकग्रामचा पादचारी पूल १८ मेपासून रहदारीसाठी बंद ला आहे. या पुलाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने एक कोटी ३८ लाख भरावेत, असे रेल्वेने सांगितले आहे. प्रत्यक्ष स्मार्ट सिटीअंतर्गत या परिसराच्या विकासात हा मुद्दा आहे. त्यामुळे महापालिकेने पैसे भरण्यास नकार देत यापूर्वी दिलेले ७४ लाख कशावर खर्च केले, असा सवाल महापालिकेने उपस्थित करून रेल्वेला फैलावर घेतले आहे.
डोंबिवली स्टेशन ते मानपाडा येथील नांदिवली पुलाचे एका बाजूचे काम अर्धवट आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे मानपाडा रस्त्यावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. कल्याण-शहाडदरम्यान वालधुनी पुलाचे काम सुरू आहे. या पुलाची एक बाजू बंद करण्यात आली आहे. दुसरी बाजू प्रगतीपथावर आहे. त्यामुळे कल्याण-मुरबाड रोडवर शहाड पुलाच्या आधीच वाहतूककोंडी ॅहोत ओहे. याशिवाय, वालधुनी पुलावर कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरून आनंद दिघे उड्डाणपुलावरून वाहतूक वळते. त्यामुळे वालधुनी पूलही सकाळ-सायंकाळी वाहतूककोंडीने गच्च भरलेला असतो. २०१६ मध्ये कल्याण-दुर्गाडी खाडीपुलाला समांतर सहापदरी पूल उभारला जाणार होता. या पुलाचे अर्धवट काम टाकून कंत्राटदार पळून गेला. त्यामुळे नवा कंत्राटदार नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. २०१६ पासून पुलाचे काम सुरू आहे. ते मार्गी लागत नसल्याने कल्याण-भिवंडी मार्गावरील अस्तित्वात असलेला खाडीपूल हा वाहतूककोंडीचे जंक्शन झालेला आहे. याशिवाय, कल्याण शहरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी गोविंदवाडी बायपास हा रस्ता तयार केला गेला. त्याचे नियोजन चुकले.
ठाकूर्ली रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र, पूर्वेला त्याची एक बाजू स.वा. जोशी शाळेनजीक उतरते. सगळीच वाहने स.वा. जोशी शाळेकडे न वळता पुलावरून कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली असती. तसेच जोशी शाळा परिसर, सारस्वत कॉलनी, ठाकुर्ली-चोळेगाव येथे कोंडीत त्यांना अडकावे लागले नसते. या सगळ्या पूलकोंडीस सत्ताधारी शिवसेना-भाजप युती जबाबदार असल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम म्हणाले.
>२० मिनिटांत ठाणे तूर्तास कागदावरच
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली या खाडीपुलाचे काम २०१६ मध्ये सुरू करण्यात आले होते. या पुलाचे काम डोंबिवलीच्या दिशेने काही अंशी झालेले आहे. मात्र, माणकोलीच्या दिशेने भूसंपादनाचा प्रश्न निरुत्तरीत राहिल्याने २०१६ पासून हा खाडीपूल मार्गी लागलेला नाही. त्यामुळे डोंबिवली ते भिवंडी, ठाणे हे २० मिनिटांत अंतर कापण्यात येईल, हा दावा तूर्तास तरी कागदावरच आहे. त्यामुळे डोंबिवली ते ठाणे, भिवंडीला जाण्यासाठी कोपर रेल्वे उड्डाणपुलावरूनच जावे लागत आहे. हा पूलही २७ मे पासून बंद झाल्यास ठाणे-भिवंडी सोडा, शहरात पूर्व-पश्चिमेला ये-जा कशी करायची, असा प्रश्न आहे.