कल्याण ग्रामीणच्या विकासावर भर
By admin | Published: May 11, 2017 01:51 AM2017-05-11T01:51:05+5:302017-05-11T01:51:05+5:30
कल्याण ग्रामीणचा भाग अनेक वर्षांपासून पायाभूत सोयीसुविधांपासून वंचित होता. पण, आता सरकारच्या विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण ग्रामीणचा भाग अनेक वर्षांपासून पायाभूत सोयीसुविधांपासून वंचित होता. पण, आता सरकारच्या विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी या भागातील विकासकामांसाठी आला. त्यामुळे विकासाची कामे करून या परिसराचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केला.
कल्याण ग्रामीण परिसरातील एक कोटी २० लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी भोईर बोलत होते. भोईर यांच्या आमदार निधीतून दहिसर मोरी गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी पाच लाख, उत्तरशीव ते नारिवली रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २५ लाख, घेसर ते वडवली रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २५ लाख, शिरढोण ते बाळे कॅम्पपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २५ लाख, नारिवली ते वडवली रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख, शिरढोण गावातील तलावाचे सुशोभीकरण करणे, जनसुविधा योजनेतून दहिसर मोरी येथे स्मशानभूमी बांधण्यासाठी १० लाख, जनसुविधा योजनेतून नारिवली स्मशानभूमी बांधण्यासाठी आठ लाख, जनसुविधा योजनेतून बाळेगाव स्मशानभूमीची संरक्षक भिंत बांधण्यासाठी साडेसहा लाखांची कामे केली जाणार आहे. या कामांचा शुभारंभ झाला.
वडवली-शिरढोण गाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर
आमदार आदर्श गाव योजनेंतर्गत भोईर यांनी दत्तक घेतलेल्या वडवली-शिरढोण गावात जवळपास सर्वच सरकारी योजना राबवण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी निवडलेल्या आमदार आदर्श गाव योजनेतून तुलना करावयाची झाल्यास वडवली-शिरढोण गावाचा प्रथम
क्रमांक लागेल, असे आदर्श गाव योजनेचे अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. भोईर यांनी गावात राबवलेल्या योजनांमुळेच ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.