कल्याणमध्ये हिट अॅण्ड रन, भरधाव कारने वृद्धाला दिली धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 04:11 PM2017-08-26T16:11:55+5:302017-08-26T16:14:16+5:30
कल्याणमध्ये दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालविणाऱ्या एका व्यक्तीने वृद्धाला उडविल्याची घटना घडली आहे.
कल्याण, दि. 26- कल्याणमध्ये दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालविणाऱ्या एका व्यक्तीने वृद्धाला उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. भरधाव कार चालविणारा व्यक्ती हा एका श्रीमंत घरातील असल्याचं समजतं आहे. त्या धनदांडग्या कार चालकाच्या विरोधात दहा दिवसांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारु पिऊन भरधाव गाडी चालविण्यामुळे एका वृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान,ड्रंक अॅण्ड ड्राईव्हला कधी आळा बसणार असा सवाल नागरीकांकडून व्यक्त केला जातो आहे.
शहराच्या पश्चिम भागातील रामबागेत राहणारे आस्तीक गोटे हे रेशनिंग कार्यालयातून निवृत्त झालेले वृद्ध होते. त्यांचे वय जवळपास 70 वर्षाचे होते. 15 ऑगस्टच्या दिवशी रस्त्याने चालत असताना त्यांच्या मागून येणाऱ्या भरधाव हुंडाई आय-20 या गाडीने उडविले. ही घटना 15 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी घडली. जखमी झालेल्या गोटे यांना प्रथम कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलविले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार शक्य नसल्याने डॉक्टरांच्या सल्याने त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना 19 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात दारु पिऊन भरधाव गाडी चालविणा:या सामिर देठे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देठे हे उच्चभ्र श्रीमंत घरातील आहे. ते रामबागेतच राहतात. ते दारु पिऊन भरधाव गाडी चालवित होते. त्यामुळे हा अपघात झाला. त्यात गोटे यांना जीव गमाविण्याची वेळ आली. या अपघातात केवळ गोटे हे एकच पादचारी जखमी झालेले नव्हते. तर अन्य एक पादचारीही जखमी झाला होता.