लक्ष्मी मार्केटमध्ये कल्याण मेट्रो? व्यापा-यांचा कडाडून विरोध : सॅटीस किंवा मॉलची जागा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:03 AM2017-11-14T02:03:39+5:302017-11-14T02:06:33+5:30

कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत येणाºया ठाण्याच्या मेट्रोला थांबा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ठाम विरोध केल्याने आता लक्ष्मी मार्केटच्या जागेचा प्रस्ताव मेट्रोचे समर्थन

 Kalyan Metro in Lakshmi Market? Opposition activists protest: Kalyan Metro in demand for seat or mall? | लक्ष्मी मार्केटमध्ये कल्याण मेट्रो? व्यापा-यांचा कडाडून विरोध : सॅटीस किंवा मॉलची जागा देण्याची मागणी

लक्ष्मी मार्केटमध्ये कल्याण मेट्रो? व्यापा-यांचा कडाडून विरोध : सॅटीस किंवा मॉलची जागा देण्याची मागणी

googlenewsNext

मुरलीधर भवार
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत येणाºया ठाण्याच्या मेट्रोला थांबा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ठाम विरोध केल्याने आता लक्ष्मी मार्केटच्या जागेचा प्रस्ताव मेट्रोचे समर्थन करणाºया नेत्यांनी पुढे केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. मात्र असा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा पवित्रा तेथील व्यापाºयांनी घेतल्याने मेट्रोची स्थानककोंडी वाढली आहे.
बाजार समितीच्या नेत्यांनी मॉलच्या जागेत स्थानक उभारावे, असा सल्ला दिला आहे, तर व्यापाºयांनी नव्याने उभारल्या जाणाºया सॅटिसमध्येच मेट्रोला जागा द्यावी, अशी सूचना केली आहे. नियोजन नसताना प्रकल्प कसा आखता, असा प्रश्नही त्यांनी केला. कल्याणला मेट्रो अवश्य आणावी, पण ती आमच्या पोटावर पाय आणून उभारू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
कल्याण रेल्वे स्थानकपासून हाकेच्या अंतरावर असलेले लक्ष्मी मार्केट ७० वर्षापासून अस्तित्त्वात आहे. तेथे गोळा होणाºया कचºयावर कारवाई झाली, तेव्हा तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांना मार्केटच्या जागेवर मॉल उभारायचा आहे, असा आरोप व्यापाºयांनी केला होता. या मोक्याच्या जागेवर महापालिकेचा डोळा असून ही जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आखला जात असल्याचा संशयही व्यापाºयांनी व्यक्त केला होता. लक्ष्मी मार्केटमधील फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघटनेचे सहचिटणीस व बाजार समितीमधील संचालक सदस्य मोहन नाईक यांनी सांगितले, स्टेशन परिसरातील लक्ष्मी मार्केटची जागा अवघी तीन एकर आहे. त्या जागेवर कारशेड किंवा मेट्रोच्या स्टेशनचा विचार होऊ शकत नाही. ही खाजगी जागा आहे. तिचे चार-पाच मालक आहे. त्यामुळे ही जागा प्रकल्पासाठी देण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. लक्ष्मी मार्केटमध्ये जवळपास एक हजार व्यापारी व्यापार करतात. एमएमआरडीएने जर मेट्रोसाठी ही जागा बळकावण्याचा प्रयत्न जरी केला, तरी तो हाणून पाडला जाईल. व्यापाºयांचा प्रतिनिधी म्हणून विरोध असेल. नियोजन नसताना प्रकल्प कसा काय आखता आणि मंजूर करता, असा प्रश्न त्यांनी विचारला. प्रकल्पाला आमचा विरोध नाही. पण आमच्यावर गदा आणणारा प्रकल्प आम्हालाच काय कोणालाही मान्य नसेल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
मेट्रोचा रिंग रूट
ठेवण्याची मागणी
ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोपाठोपाठ कल्याण ते तळोजा ही मेट्रोही प्रस्तावित आहे. तळोजा ते शीळ, मुंब्रा, ठाणे असे मेट्रो रेल्वेचे वर्तुळ पूर्ण केले जाणार आहे. सध्याच्या ठाणे-कल्याण मेट्रोत दुर्गाडी, सहजानंद चौक, बाजार समिती ही स्थानके जवळजवळ आहेत. त्यामुळे दुर्गाडीहून येणारी मेट्रो कल्याण स्टेशनपर्यंत आणून मुरबाड रोड, बिर्ला कॉलेज, आधारवाडीमार्गे माघारी नेल्यास बरेच प्रश्न सुटतील, अशा रिंगरोडची सूचना करण्यात आली आहे. कल्याण- डोंबिवली रिंग रोडवर हा मार्ग उभारला, तरमेट्रोच्या जागा संपादनाचे अनेक प्रश्न सुटतील, अशीही सूचना पुढे आली आहे.मेट्रोची कारशेड भरवस्तीत न करता ती कोन ते भिवंडीदरम्यान केली, तर जागा संपादनाचा प्रश्न मार्गी लागेल, असेही सुचवण्यात आले आहे.
... मग मॉलच्या जागेत उभारा मेट्रोचे रेल्वे स्थानक!
कृषी उत्पन्न बाजार समितीने मेट्रो रेल्वेच्या स्टेशनसाठी जागा देण्यास विरोध केला आहे. बाजार समितीच्या सध्याचा जागेत खाली बाजार सुरू ठेवायचा आणि त्याच्या डोक्यावर मेट्रोचे स्टेशन उभारायचे असे नियोजन आहे. त्यामुळे बाजार समितीचा विस्तार कायमस्वरूपी ठप्प होईल. तसेच एकदा मेट्रोला जागा दिला की तिची धडधड, स्टेशनमधील प्रवाशांचा वावर, त्यांना कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी रस्ता देणे, कारशेडमधील कामे यामुळे व्यापारी-ग्राहक हैराण होतील, ेहे मुद्दे बाजार समितीने लक्षात आणून दिले आहेत. राज्यातील दुसºया क्रमांकाची बाजार समिती, त्यातील शेतकरी, कामगार, व्यापारी यांच्या पोटावर गदा आणू नका, असे सांगत गोविंदवाडी बायपास किंवा जवळच्याच मॉलच्या जागेत हे स्टेशन उभारा असा सल्लाही दिला आहे. बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले, बाजार समितीचे आवार हे ४० एकरांचे आहे आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ही १९५७ पासून अस्तित्वात आहे. तिचा कारभार व बाजार हा गुरुदेव हॉटेल परिसरानजीक भरत होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कारकिर्दीत बाजार समितीला ही ४० एकरांची जागा दिली. १९८८ पासून या जागेत बाजार समितीचा कारभार सुरु आहे. यातील ७० टक्के जागा विकसित करण्यात आली आहे. मेट्रो रेल्वे स्टेशनला बाजार समितीची जागा देण्यास बाजार समितीने नकार दिल्यावर एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी चर्चेसाठी पाचारण केले होते. प्राथमिक चर्चेत एमएमआरडीएने एअर स्पेसची (वरच्या जागेची) मागणी केली होती. मुद्दा जरी एअर स्पेसचा असला, तरी स्टेशन झाल्यावर सर्व गर्दी बाजार समितीच्या आवारातच होईल. मेट्रोचे प्रवासी कुठून बाहेर पडतील, हा प्रश्न आहे. त्यांना बाहेर पडण्यासाठी आवार मोकळे करुन दिल्यास बाजार समितीची कोंडी होईल. व्यवहारांना फटका बसेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. सध्या येथे फूल मार्केटची इमारत प्रस्तावित आहे. तेथे स्टेशनची जागा कशी आणि का देता येईल? मेट्रोला केवळ स्टेशन उभारायचे नसून कारशेडही तयार करायची आहे. स्टेशनपेक्षा जास्त जागा कारशेडला लागणार आहे. स्टेशन परिसरात अन्य मोक्याच्या जागा आहेत. तेथे त्यांनी स्टेशन व कारशेड उभारावी. त्यासाठी बाजार समितीचा बळी देऊ नये, असेही घोडविंदे यांनी सांगितले.

Web Title:  Kalyan Metro in Lakshmi Market? Opposition activists protest: Kalyan Metro in demand for seat or mall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.