कल्याण-मुरबाड रेल्वेचे घोडे सर्वेक्षणावरच अडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 02:08 AM2019-02-07T02:08:01+5:302019-02-07T02:08:37+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग तयार करण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के खर्चाचा भार उचलेल, असेही जाहीर केले.
- मुरलीधर भवार
कल्याण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग तयार करण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के खर्चाचा भार उचलेल, असेही जाहीर केले. या घोषणेला दोन वर्षे उलटूनही आतापर्यंत केवळ प्राथमिक सर्वेक्षणच झाले आहे. त्यापुढे केंद्र सरकारकडून काहीच हालचाल दिसत नसल्याने या मार्गाचे घोडे पुढे सरकणार तरी कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.
कल्याण-नगर हा मार्ग ब्रिटिशांच्या काळापासून रखडलेला आहे. त्याच्या मागणीसाठी १९९६ पासून रेटा सुरू आहे. हा मार्ग रखडल्याने कल्याणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेले मुरबाड हे रेल्वेशी जोडले गेले नाही. मुरबाडमध्ये नागरीकरण वाढत असून शहराला नगरपंचायतीचा दर्जा आहे. त्यामुळे रेल्वे आवश्यक असून त्याचा फायदा शेतकरी, विद्यार्थी आणि कामगारांना होईल.
कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाने २०११ साली केली होती. ४ डिसेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांनी या मार्गाची घोषणा केली होती. भाजपा आमदार किसन कथोरे यांनी देखील ही मागणी लावून धरली होती. कल्याण-नगरमार्गासह कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. रेल्वेमार्गाची आखणी, स्थानके, त्यासाठीचा खर्च याविषयी अद्याप काहीच स्पष्टता नाही. प्राथमिक सर्वेक्षण अहवाल तयार केला असला, तरी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा उपयुक्तता अहवाल प्रतिकूल असल्याची माहिती समोर येत आहे.
प्राथमिक अहवालाला रेल्वे प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर तो रेल्वे बोर्डाच्या मान्यतेसाठी पाठवला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर हे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे सोपवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. या मार्गावर लहानमोठे पूल, एक बोगदा आणि तीन स्थानके प्रस्तावित आहेत. कांबा-वरप, गोवेलीनाका आणि त्यानंतर मुरबाड रेल्वेस्थानक असेल, असा ढोबळ अंदाज असल्याची माहिती उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली आहे. कल्याण-नगर हा रेल्वेमार्ग खाजगीकरणातून पूर्ण होऊ शकतो, अशी भूमिका दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी २००६ मध्ये मांडली होती.
कल्याण-नाशिक लोकलसेवा लवकरच सुरू होणार आहे. या मार्गावर असलेल्या कसारा घाटात लोकलचे डबे कसे चढणार, असा तांत्रिक प्रश्न उपस्थित करून ही सेवा सुरू होणे कठीण असल्याचे बोलले जात होते. त्यासाठी विशिष्ट गाड्या तयार करून या अडचणीवर मात करण्यात आली असून त्या धावण्यासाठी सज्ज आहेत. कल्याण-नाशिक लोकलचा खडतर मार्ग प्रत्यक्षात येत असताना कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गही पूर्ण करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.
३५० कोटींची लागणार तरतूद : रेल्वे प्रवासी संघटनेला माहितीच्या अधिकारामध्ये कल्याण-नगर रेल्वेमार्गासाठी पहिल्या टप्प्यात ७२१ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. हा खर्च गृहीत धरल्यास कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटींची प्राथमिक तरतूद करावी लागणार आहे.