कल्याण-नगर रेल्वेमार्गास ५० वर्षांपासून मुहूर्त सापडेना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:22 AM2019-03-14T00:22:32+5:302019-03-14T00:22:53+5:30
पुणे, ठाणे, पालघर, अहमदनगर या चार जिल्ह्यांतील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वेमार्गाचे घोंगडे गेल्या ५० वर्षांपासून भिजत पडले आहे.
- नारायण जाधव
ठाणे : पुणे, ठाणे, पालघर, अहमदनगर या चार जिल्ह्यांतील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वेमार्गाचे घोंगडे गेल्या ५० वर्षांपासून भिजत पडले आहे. माळशेज रेल्वे कृती समितीने या मार्गासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे यामार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण होऊनही केवळ राजकीय इच्छाशक्ती अपुरी पडल्यामुळे शेतकरी, नोकरदार, व्यापाऱ्यांसह विदर्भ-मराठवाड्यांच्या रेल्वे विकासात मैलाचा दगड ठरणारा हा मार्ग रखडला आहे.
सर्वपक्षीय नेत्यांच्या फसव्या घोषणा आणि रेल्वे मंत्रालयाकडून अर्थसंकल्पात करण्यात येणारी तकलादू तरतूद, एवढ्यापुरताच हा मार्ग दरवर्षी चर्चेत येतो. मात्र, पुन्हा येरे माझ्या मागल्या... म्हणत तो गटांगळ्या खात आला आहे.
आता कुठे कल्याण-मुरबाडपर्यंत रेल्वे नेण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, त्यातही विद्यमान राजकारण्यांनी आपमतबली भूमिका घेऊन पूर्वीच्या टिटवाळामार्गे तो नेण्याचा मार्ग बदलून तो आता उल्हासनगरमार्गे नेण्याचा घाट रचला आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेआधी कोणतीही तयार नसताना केवळ गुगल सर्व्हेचा आधार घेऊन त्याचे भूमिपूजन उरकले आहे. मात्र, या मार्गासाठी ना जमीन संपादित झाली आहे, ना पर्यावरणाशी निगडित परवानग्या मिळाल्या आहेत. ना मातीपरीक्षण झाले आहे. केवळ, मतदारांना मूर्ख समजून त्याचे भूमिपूजन उरकले आहे.
03 तासांत होईल अंतर पार
मागे केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात कल्याण ते अहमदनगर मार्गावर २६ रेल्वेस्थानके प्रस्तावित केली आहेत. तो सुरू झाल्यास कल्याण-अहमदनगर हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येणार आहे. तसेच अहमदनगर व पुणे जिल्ह्यांतील नाशवंत शेतमाल, दूध मुंबई येथे अत्यंत कमी वेळेत पोहोचू शकणार आहे.
हा मार्ग अहमदनगर येथे सुरू होणार असून भाळवणी, धोत्रे, वासुंदे, शिंदेवाडी, काटाळवाडी, माळवाडी, पादरवाडी, ओतूर, जुन्नर रोड, मढ, केबिन, देवरूखवाडी, नागतार सफरकेबिन, डाहरी मिल्वे, मुरबाड, पाटगाव, आपटी-कांबा रोड, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी व कल्याण असा तो आहे. यामुळे उपरोक्त गावांच्या परिसरातील पंचक्रोशीचाही विकास होणार आहे. परंतु, नव्याने विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्वार्थासाठी या मार्गात बदल केल्याने तो पुन्हा लांबणीवर पडणार आहे.
कल्याण-अहमदनगर रेल्वेमार्ग पुढे अहमदनगर-बीड-परळी या बांधकाम चालू असलेल्या रेल्वेमार्गाला जोडला जाऊ शकतो. परळी ते विशाखापट्टणम आणि परळी ते नांदेड-नागपूर असे रेल्वेमार्ग सध्या कार्यरत आहेत. यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाचे एक महाद्वार या कल्याण ते अहमदनगर रेल्वेमार्गामुळे खुले होऊ शकते. या रेल्वेमार्गाने केवळ अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर हे चार जिल्हेच नव्हे, तर मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना जोडधंदा मिळून त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील विशाखापट्टणम आणि देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर असणारी बीपीटी आणि जेएनपीटीसारखी बंदरे एकमेकांना रेल्वेमार्गे जोडता येणार आहेत. तसेच आणीबाणीप्रसंगी सैन्यासह शस्त्रास्त्रे, रणगाडे, युद्धाला लागणारी रसद वेगाने पोहोचवण्यासही मदत होणार आहे. शिवाय, इतर दैनंदिन सामग्रीसह कारखान्यांना लागणाºया सुट्या भागांची नेआण करणे सोपे होणार आहे.
वास्तविक, कल्याण ते अहमदनगर या रेल्वेमार्गाचे इंग्रज राजवटीतच सर्वेक्षण झाल्याचे सांगितले जाते. परंतु, त्यावर रेल्वे सुरू झाल्यास विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील स्वातंत्र्यसैनिकांना तो फायदेशीर ठरेल, अशी भीती वाटल्याने ब्रिटिशांनी पुढे काहीच हालचाल केली नाही, असे अभ्यासकांचे मत आहे. यानंतर, स्वातंत्र्योत्तर काळात १९५०, १९७३, २०००, २००६, २०१० असे अनेकदा या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. २०१० मध्ये तर त्याचा रेल्वेच्या पिंकबुकमध्ये समावेश होऊनही तो रखडला आहे.
खासगीकरणातून बांधण्याचाही विचार
मधू दंडवतेंपासून ठाण्याचे माजी खासदार दिवंगत प्रकाश परांजपे यांनी या मार्गासाठी बºयापैकी पाठपुरावा केला आहे. यासाठी खासगीकरणातून तो बांधावा का, याबाबतही त्यावेळी संसदेत विचारविनिमय झाला आहे.
पर्यटनासही चालना मिळेल
कल्याणहून नाशिकमार्गे अहमदनगरला जाण्यासाठी वळसा घेऊन जावे लागते. हाच प्रवास कल्याणहून मुरबाड-माळशेज घाटमार्गे आळेफाट्यावरून केला, तर हेच अंतर सुमारे १०० ते १५० किलोमीटरने कमी होते.
या रेल्वेमार्गात माळशेज घाट हे एक तगडे आव्हान रेल्वेसमोर आहे. यामुळेच कल्याण-नगर रेल्वेमार्गाने गती पकडलेली नाही. टिटवाळा ते मुरबाड मार्गानंतर मुरबाड ते नगर हा रेल्वेमार्ग झाला, तर या मार्गावरील शिवनेरी, हरिश्चंद्रगड, माळशेज घाट या ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व वाढेल.
तसेच अष्टविनायकांमधील लेण्याद्री, ओझर, कोरथनचा खंडोबा, कापर्डिकेश्वर या तीर्थस्थळांना भेटी देणाºया भाविकांचा प्रवास सुलभ होऊन पर्यटनवाढीसही मदत होईल.