फेरिवाले हटले पण रेल्वे स्थानकातून केडीएमटीची बस सुविधा कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 07:30 PM2019-01-15T19:30:34+5:302019-01-15T19:30:38+5:30
डोंबिवली पश्चिमेला बस रेल्वे स्थानकातून सोडण्याच्या उद्देशाने स्थानकाच्या मधल्या पादचारी पुलानजीकची रेल्वेने संरक्षक भिंत तोडून तेथे प्रवेशद्वार करण्यात आले होते. पण अल्पावधीतच परिवहनने सुरू केलेली ७१, ७२ क्रमांकाची बस बंद झाली.
डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेला बस रेल्वे स्थानकातून सोडण्याच्या उद्देशाने स्थानकाच्या मधल्या पादचारी पुलानजीकची रेल्वेने संरक्षक भिंत तोडून तेथे प्रवेशद्वार करण्यात आले होते. पण अल्पावधीतच परिवहनने सुरू केलेली ७१, ७२ क्रमांकाची बस बंद झाली. त्यामुळे प्रवेशद्वार खुले झाले, पण बस मात्र नाही अशी स्थिती असल्याने प्रवासी नाराज आहेत. केडीएमटीच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे डबघाईत जाणारी परिवहन सेवेला चांगले दिवस येणार तरी कसे?,अशी टीका नागरिकांमधून व्यक्त होत आहे. परिवहनचे माजी सभापती भाऊ चौधरी यांनी रेल्वे स्थानक परिसरातून बस सोडण्यासाठी प्रयत्न केले होते, पण ते कागदावरच राहिल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाले हटवले आहेत. त्या पाठोपाठ रेल्वे स्थानक परिसरातून बस सुविधा द्यावी, अशी अपेक्षा डोंबिवलीकरांनी व्यक्त केली. पण त्यात केडीएमटी प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा आभाव दिसून येत आहे. त्याचा लाभ परिसरातील रिक्षा चालक घेत आहेत. रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला डॉ. राथ रोड आणि पाटकर रोड परिसरातील फेरिवाले महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटवले. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान असले तरीही स्थानकातून बस सुविधा मिळालेल्या नाहीत. फेरीवाल्यांसह गर्दीमुळे स्थानक परिसरात बस आणता येत नाही, असे स्पष्टीकरण परिवहन विभागाने दिले होते, पण आता तर फेरिवाले आभावानेच दिसत आहेत.
त्यामुळे तेथे तात्काळ बस सुविधा द्या अशी मागणी नागरिकांची आहे. पण त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने राथ रोडवर जागा असूनही केळकर रोडच्या कॉर्नवरुनच शहरात बस सोडल्या जात आहेत. पाटकर रोड मार्गे तसेच स्थानकातून बस सेवा देण्यासाठी तत्कालीन परिवहन सभापती संजय पावशेंनी प्रयत्न केले होते, परंतू त्यानंतर आता पुन्हा स्थिती जैसे थे असून स्थानकातून बसची मागणीही मागे पडली आहे. त्या उद्देशाने डॉ. राथ रोडवरील एका हॉटेलचे फॅनिंगही केले, परंतू त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.
रस्ते काँक्रिटीच्या कामामुळे पश्चिमेला बसचे मार्ग बंद झाले होते. कोपर मार्गावरचे नक्की नाही, पण शहरातील रिंगरूट मात्र आता पुन्हा सुरू करू. तसेच सेवा बंद का केल्या हे प्रशासनाला विचारणार, त्यासाठी परिवहनच्या सभेत आवाज उठवणार. तसेच पूर्वेला रेल्वे स्थानकालगत बस सोडण्यासाठीही प्रयत्न करणार. - संजय पावशे, माजी सभापती, कल्याण डोंबिवली परिवहन समिती
पश्चिमेकडील रेल्वे स्थानकालगत कल्याण डोंबिवली परिवहनच्या बस सोडण्यासाठी तत्कालीन सभापती संजय पावशे यांनी दोन बस सोडल्या होत्या, मात्र रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या नावाखाली त्या बस बंद करण्यात आल्या असून त्यास आता वर्ष झाले तरी त्या पुन्हा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे डोंबिवली ते कोपर मार्गावर तसेच फुले रोड मार्गे दिनदयाळ रोडवरून परत स्टेशनला येणारी बसचे मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे पश्चिमेकडे परिवहनच्या सुविधेचा आभाव असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्या बस तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. त्या बस सोडण्यासाठी त्यांना अद्ययावत बस थांबा देखिल तयार करण्यात आला होता. त्यासाठी मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाच्या मधल्या पादचारी पूलाला तातडीने जाता यावे यासाठी भिंत पाडण्यात आली होती. तेव्हापासून मधल्या पुलासाठी थेट जाता येत असले तरी ज्या उद्देशासाठी बस थांबा करण्यात आला होता, त्या उद्देशाला परिवहननेच हरताळ फासला आहे.