‘कल्याण’ शिवसेनेचेच यावर शिक्कामोर्तब
By admin | Published: November 3, 2015 01:10 AM2015-11-03T01:10:48+5:302015-11-03T01:10:48+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष होण्याकरिता कल्याण पश्चिमेतील २८ जागांपैकी शिवसेनेच्या पारड्यात पडलेल्या २१ जागा तर पूर्वेतील
- प्रशांत माने, कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष होण्याकरिता कल्याण पश्चिमेतील २८ जागांपैकी शिवसेनेच्या पारड्यात पडलेल्या २१ जागा तर पूर्वेतील २० पैकी १६ जागांवर मिळालेले यश हेच मुख्य कारण ठरले आहे. एकूण ५२ जागांवर विजय प्राप्त करणाऱ्या शिवसेनेचे कल्याण याच ३७ जागांमुळे झाले.
एकीकडे कल्याणने शिवसेनेला भरभरून दिले असताना याच शहरातून त्यांच्या महापौर कल्याणी पाटील यांच्यासह सभागृह नेते कैलास शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला एकूण ३१ जागा मिळाल्या होत्या. यावेळेस तर ती सर एकट्या कल्याणातूनच भरुन निघाली आहे. त्यामुळे डोंबिवलीसह टिटवाळा, आणि ग्रामीण भागातून सेनेला मिळालेले यश हे बोनस पकडले जात असल्याचे स्पष्ट झाले.
उंबर्डे, गांधारे, बारावे, मोईली, वडवली, आंबिवली, बल्याणी, शहाड, मिलींद नगर, वायले नगर, म्हसोबा मैदान, रामदास वाडी, रामबाग खडक, श्रेयस समेळ, बिर्ला कॉलेज, वडवली, रामदासवाडी, बैलबाजार, अशोक नगर, गावदेवी आदी भागातून शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे या ठिकाणी भगवा डौलाने फडकला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते आपल्या शेवटच्या सभेला कल्याणमध्ये आले होते तेव्हा ही विजयाची सभा असल्याचे म्हंटले होते. कल्याणमधील सैनिकांचीही कडवा, कट्टर शिवसैनिक अशीच ओळख आहे. त्यांच्यामध्ये पक्ष आदेशाला प्रचंड महत्व असून डोंबिवलीतील सैनिकांच्या तुलनेने ते अधिक आक्रमक आणि स्पर्धेत पुढे असल्याचेही वेळोवेळी दिसून आले. दुर्गाडी गडावरचा घंटानाद असो की श्री मलंग यात्रा अशा हिंदुत्वाच्या मुद्यावर त्या ठिकाणचा सैनिक एकजुटीने कार्यरत असतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचेही कल्याणकरांवर विशेष प्रेम होते. धर्मवीर आनंद दिघेंना मानणारे नेते अजुनही त्यांच्या स्मृतींना उजाळा देतांना तसे हिंदुत्व आता नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करतात.
कल्याणमध्ये शिवसेना स्ट्राँग असल्याची जाण पालकमंत्री एकनाथ शिंदेंना होती, म्हणूनच की काय त्यांनी तुलनेने ‘वीक’ असलेल्या डोंबिवलीत जरा जास्त लक्ष घातले होेते. गेल्या पंधरवड्यात त्यांनी डोंबिवलीतच ठाण मांडले होते. कल्याणकरांनी शिवसेनेला भरभरून दिले तरीही त्यांना सत्तेच्या मॅजीक फिगरपासून दूर राहावे लागले आहे.
भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनीही गेल्या काही दिवसात शिवसेनेला अंगावर घेण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे डोंबिवलीचे माहीत नाही, पण कल्याणात सेनाच अग्रक्रमी असणार असा चंग तेथील नेत्यांनी बांधला होता, झाले ही तसेच.कल्याण पूर्वेत मात्र भाजपचे नामोनिषाण नव्हते, आमदार गणपत गायकवाड यांनी त्या ठिकाणी भाजपाचे कमळ फुलवले असले तरीही शिवसेनेला चांगले यश मिळाले..