कल्याणमध्ये पोलीस आणि शिवसैनिकांत झाली शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:38 AM2019-03-24T00:38:53+5:302019-03-24T00:39:01+5:30
पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात साकारलेला शिवकालीन सर्जिकल स्ट्राइकचा देखावा शिव जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी केल्यास आचारसंहितेचा भंग होऊ शकतो.
कल्याण : पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात साकारलेला शिवकालीन सर्जिकल स्ट्राइकचा देखावा शिव जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी केल्यास आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी नोटीस महात्मा फुले पोलिसांनी विजय तरुण मंडळाचे व्यवस्थापक विजय साळवी यांना बजावली होती. त्यानंतरही पोलिसांनी रामबाग ते आंबेडकर उद्यानापर्यंतच हा देखावा नेण्याची परवानगी दिली. मात्र, आंबेडकर उद्यानाजवळ मिरवणूक येताच संपूर्ण मिरवणुकीत हा देखावा असेल, असा आग्रह साळवी यांनी धरल्याने पोलीस व शिवसैनिकांत वादंग झाला. यावेळी शिवसैनिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जोरदार घोषणाही दिल्या. अखेरीस हा देखावा संपूर्ण मिरवणुकीत होता.
रामबाग शिवसेना शाखेने शिवकालीन सर्जिकल स्ट्राइकचा देखावा तयार केला होता. शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती. त्यानंतर, पळून गेलेला शाहिस्तेखान पुन्हा महाराष्ट्रावर कधीही चाल करून आला नाही. शिवाजी महाराजांनी केलेले अनेक शिवप्रताप हे गनिमी कावा होेते, हे या देखाव्यात दाखवण्यात आले होते.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय सैन्यावर केलेल्या हल्ल्यात ४६ जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई दलाने पाकिस्तानात जाऊन एअर सर्जिकल स्ट्राइक केला. त्यानंतरही पाकिस्तानाकडून आपले सैनिक मारले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानला कायमचे उत्तर देण्यासाठी युद्ध पुकारले जावे, अशी मागणीही या देखाव्यात करण्यात आली होती.
याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी साळवी यांना नोटीस बजावली. त्यात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतरही पोलिसांनी रामबाग ते आंबेडकर उद्यानापर्यंतच हा देखावा नेण्याची परवानगी दिली. त्यानुसार, आंबेडकर उद्यानानजीक देखावा पोहोचताच साळवी यांनी संपूर्ण मिरवणुकीत देखावा नेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे पोलीस व शिवसैनिकांत वाद झाला.
दरम्यान, यापूर्वीही मंडळाने अफजलखानाचा वध हा देखावा सादर करण्याप्रकरणी २०१० मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला अधीन राहूनच मंडळाने निर्णय घ्यावा. पुन्हा शाहिस्तेखानाची बोटे छाटली, हा देखावा सादर केल्याने कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, असा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला होता.
शिवकालीन सर्जिकल स्ट्राइकच्या देखाव्यामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही. पोलिसांकडून अगोदर दिलेली नोटीस म्हणजे आचारसंहितेचा बाऊ करण्याचा प्रकार होता.
- विजय साळवी, व्यवस्थापक,
विजय तरुण मंडळ
पोलीस काय कारवाई करणार?
पोलिसांच्या नोटीसनंतर देखावा मिरवणुकीत सहभागी झाल्याने व त्यावरून वादंग झाल्याने आता पोलीस साळवी यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.