विद्यार्थ्यांनी चालवले कल्याणचे सार्वजनिक वाचनालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:01 AM2019-03-12T00:01:57+5:302019-03-12T00:02:33+5:30
पिसवली शाळेचा उपक्रम; दोन दिवस घेतला कारभाराचा अनुभव
कल्याण : सुमारे १५५ वर्षांची परंपरा असलेले अद्ययावत आणि सुसज्ज सार्वजनिक वाचनालय दोन दिवस पिसवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी चालवले. संगणीकृत, वातानुकूलित असलेल्या या वाचनालयात दरदिवशी शंभरहून अधिक वाचक येतात. पुस्तकांच्या नोंदी, त्यांची ओळख तसेच वाचनालयाचा कारभार नेमका कसा चालतो, ग्रंथपालाच्या जबाबदाऱ्या याबाबत विद्यार्थ्यांनी जाणून वाचनालयाचा पसारा जवळून अनुभवला.
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी हा उपक्रम तीन वर्षांपासून राबवला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या या उपक्रमात पिसवली शाळेच्या २० विद्यार्थ्यांनी सकाळी १० ते सायंकाळी ८ वेळेत सहभाग घेतला. कथा, कविता, कादंबरी, ललित, चरित्र, नाटक, ऐतिहासिक ग्रंथ, धार्मिक ग्रंथ, तसेच बालसाहित्याची या विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. ग्रंथपाल, कर्मचाऱ्यांचे काम, अध्यक्ष, सरचिटणीस तसेच वाचनालयाच्या सदस्यांचे काम करतात, पुस्तकांची होणारी देवाण-घेवाण याबाबत दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी कुतूहलाने जाणून घेतले.
लहान मुलांपासून ते ऐंशी वर्षांपर्यंतच्या वाचनाच्या आवडीनिवडी जाणून घेण्याची संधी यानिमित्ताने या विद्यार्थ्यांना मिळाली. महाविद्यालयीन विद्यार्थीही सभासद असून त्यांची मागणी सर्वाधिक संदर्भग्रंथांना असते, असे निरीक्षण विद्यार्थ्यांनी नोंदवले.
पिसवली शाळा ही नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्र मांसाठी ठाणे जिल्ह्यात अग्रेसर आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाचनाची गोडी आणि वाचनालयासंदर्भातील माहिती सविस्तर विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून हा उपक्र म हाती घेतला, असे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सांगितले.
वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी मुलांशी गप्पा मारून त्यांना जिज्ञासा, वाचन संस्कृती रु जावी यासाठी वाचले पाहिजे, त्याचबरोबर लेखन करायला पाहिजे, असा सल्ला देत स्वत:चे अनुभवही सांगितले. वाचनालयामध्ये येणाºया वाचकांचे विविध अनुभव विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी पडतील, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे
मुलांनी पुस्तकांची देवघेव करण्याबरोबरच पुस्तकांना कव्हर घालणे, त्यांचे बायडिंग करणे, वर्तमानपत्राच्या घड्या घालणे, वाचकांनी आणलेले पुस्तके पुन्हा जागेवर नंबरप्रमाणे लावणे, नवीन सभासद बनवणे, वर्गणी याबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबाबत गौरी देवळे यांनी आभार मानले.