खाजगी हॉस्पीटल मधील पेशन्ट आणि स्टॉफलाच केले पालिकेने क्वाँरन्टाईन, ४२ जणांना ठेवले देखरेखेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 03:57 PM2020-03-31T15:57:58+5:302020-03-31T15:59:36+5:30

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णामुळे आता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घोडबंदर भागातील संपूर्ण खाजगी हॉस्पीटलच क्वॉरन्टाइन केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये विविध स्वरुपाचे उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या ९ रुग्णांचा देखील समावेश आहे.

Kalyan quarantine patient, staff kept in private hospital | खाजगी हॉस्पीटल मधील पेशन्ट आणि स्टॉफलाच केले पालिकेने क्वाँरन्टाईन, ४२ जणांना ठेवले देखरेखेखाली

खाजगी हॉस्पीटल मधील पेशन्ट आणि स्टॉफलाच केले पालिकेने क्वाँरन्टाईन, ४२ जणांना ठेवले देखरेखेखाली

googlenewsNext

ठाणे : एकीकडे कोपरीतील आनंद नगर भागातील ६२ नागरीकांना घोडबंदर भागातील कासारवडवली भागात क्वॉरन्टाईन केले असतांनाच, आता याच भागातील एका खाजगी रुग्णालयालाच पालिकेने क्वॉरन्टाइन केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये हॉस्पीटलचा ३३ जणांचा स्टाफ आणि त्याठिकाणी विविध उपचार घेण्यासाठी दाखल झालेले ९ रुग्ण अशा तब्बल ४२ जणांना क्वॉरन्टाइन करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या रुग्णालयात २३ मार्च पर्यंत एक रुग्ण हा उपचारासाठी दाखल होता, आता तो रुग्ण इतर रुग्णालयात उपचार घेत आहे. परंतु आता त्याचा रिपोर्ट हा कोरोना पॉझीटीव्ह आल्याने पालिकेने हे पाऊल उचलले आहे.
                  आनंद नगर भागातील ६२ नागरीकांना कासारवडली येथे देखरेखाली ठेवले आहे. सध्या त्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत. परंतु त्यांना १४ दिवस येथे ठेवले जाणार आहे. दुसरीकडे शहरातील कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. त्यानुसार खरबरादाची उपाय म्हणून पालिकेच्या माध्यमातून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. अशातच आता संपूर्ण खाजगी हॉस्पीटलच पालिकेने क्वॉरन्टाइन केल्याने नागरीकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे यातून दिसत आहे. सोमवारी वर्तक नगर येथील एका नागरीकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण परदेशवारी करुन आला होता. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने तो उपचारासाठी घोडबंदर भागातील खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता. १८ मार्च ते २३ मार्च पर्यंत तो या रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर तो मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल झाला. दरम्यान सोमवारी त्याचा रिपोर्ट आला असून त्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
त्यानुसार सुरक्षिततेचा उपाय म्हणून पालिकेने घोडबंदर भागातील खाजगी हॉस्पीटलच क्वॉरन्टाइन केले आहे. या हॉस्पीटलमध्ये ३३ जणांचा स्टाफ असून येथे ९ रुग्ण विविध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. परंतु आता या सर्वांनाच हॉस्पीटलमध्येच क्वारन्टाइन करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. त्यांची तपासणी करण्यात येऊन पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Kalyan quarantine patient, staff kept in private hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.