माणकोली पुलासह कल्याण रिंगरोडचे साडेपाचशे कोटी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:39 PM2020-02-10T23:39:28+5:302020-02-10T23:39:32+5:30
केडीएमसीची अनास्था : मंत्रालयात लवकरच बैठक
सुरेश लोखंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मोठागाव-माणकोली खाडीपूल, कल्याण रिंगरोड तब्बल साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून तयार होणार आहे. रिंगरोडच्या कामाची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महापालिकेने झटकून एमएमआरडीएवर ढकलल्याचा आरोप आमदार रवींद्र चव्हाण यांनी नुकताच डीपीसीत केला. यामुळे हा निधी पडून असून खाडीपुलासह कल्याण रिंगरोड, शीळफाटा रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात लवकरच बैठक लावण्याच्या तयारीत आहेत.
मोठागाव-माणकोली खाडीपूल, कल्याण रिंगरोडसाठी साडेपाचशे कोटींचा निधी पडून आहे. केडीएमसी, एमएमआरडीए या कामांकडे लक्ष देत नसल्यामुळे कामास विलंब होत असल्याचा आरोप करून त्यांनी केडीएमसीला धारेवर धरले. या कामासाठी पालिका टीडीआर देत नसल्याची खंतही व्यक्त केली.
तबेल्यांच्या जागा संपादनात अडचणी
मोठागाव परिसरात या रस्त्यासाठी
90%
जमिनीचे संपादन झाले आहे. मात्र, माणकोलीच्या बाजूकडून जमिनीच्या संपादनास तीव्र विरोध होत असल्याचे भिवंडी प्रांतांकडून सांगितले जात आहे.
या रस्त्यासाठी माणकोलीकडून १०० लोकांच्या जागा संपादन करायच्या आहेत. यात सर्वाधिक तबेल्यांच्या जागा आहेत. तबेल्यांच्या जागा बळकावलेल्या आहेत. यामुळे त्यांना भरपाई देता येत नसल्यामुळे या लोकांकडून जागेच्या संपादनाला तीव्र विरोध होत आहे.
यामुळे या कल्याण रिंगरोडसह शीळफाटा रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन केडीएमसी व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहे.
टीडीआरमुळे विलंब
या रिंगरोडसाठी सुमारे ६० टक्के जागा संपादित झाल्याचे उघडकीस आले. काही ठिकाणच्या जागांचे टायटल क्लीअर नसल्यामुळे टीडीआर देणे शक्य नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
या रस्त्याचे काम महापालिकेने एमएमआरडीएवर ढकलल्यामुळे या कामास विलंब होत असल्याचे चव्हाण यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले.
लोकहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाºया या रिंगरोडच्या मोठागाव-माणकोली-खाडीपूलही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडला आहे. या कामाचे अॅलॉटमेंट दोन वेळा बदलल्याची माहिती त्यांनी दिली.
कल्याण परिसरातील
वाहतूककोंडी दूर होणार
मोठागाव-माणकोली खाडीपुलावरून हा कल्याण रिंगरोड पुढे मुंबई-नाशिक महामार्गास जोडला जाणार आहे. यामुळे कल्याण परिसरात होणारी वाहतूककोंडी संपणार असून काही मिनिटांतच चालकांना नाशिक महामार्गावर जाता येणार आहे.