कल्याण ग्रामीण मतदारसंघात झाले ४६.३७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 02:29 AM2019-10-22T02:29:41+5:302019-10-22T02:30:06+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघात सोमवारी सायंकाळी ६ पर्यंत अंदाजे ४६.३७ टक्के मतदान झाले.

In Kalyan Rural Constituency, voter turnout was 46.37 percent | कल्याण ग्रामीण मतदारसंघात झाले ४६.३७ टक्के मतदान

कल्याण ग्रामीण मतदारसंघात झाले ४६.३७ टक्के मतदान

Next

कल्याण : विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघात सोमवारी सायंकाळी ६ पर्यंत अंदाजे ४६.३७ टक्के मतदान झाले. मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले असून, उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंद झाले आहे. आता उमेदवार व मतदारांना निकालाची प्रतीक्षा आहे. मतमोजणी गुरुवारी होणार असून, त्यानंतर निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, २०१४ मध्ये या मतदारसंघात ४५.१९ टक्के मतदान झाले होते.

कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे आणि मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांच्यात लढत आहे. मानपाडा-माणगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. या मतदानकेंद्रावरील एक ईव्हीएम मशीन १० मिनिटांसाठी बंद पडल्याने मतदारांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त न झाल्यास यंत्र बदलण्यात येईल, असे स्पष्ट केले. मात्र, १० मिनिटांनी ईव्हीएम मशीन सुरू झाल्याने मतदान पुन्हा सुरू झाले.

अनेक ठिकाणी सकाळी ८ पासून मतदार मतदानासाठी घराबाहेर पडताना दिसले. सकाळी १० नंतर मतदानाचे प्रमाण वाढले. दुपारी १ वाजेपर्यंत मतदारसंघात २४ टक्के मतदान झाले. ही टक्केवारी डोंबिवली, कल्याण पूर्व आणि पश्चिमच्या तुलनेत जास्त होती. त्यानंतर, दुपारी ३ वाजता ३४ टक्के मतदान झाले होते.

मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाची उमेदवारांनी धास्ती घेतली होती. मतदानाच्या दिवशीही पावसाने पाठ सोडली नाही, तर मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होईल, अशी चिंता त्यांना होती. मात्र, सोमवारी सकाळी पावसाळी वातावरण असले, तरी १० वाजल्यानंतर पावसाने उघडीप घेतली. त्यामुळे मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले.

मात्र, घेसर येथे ३००, तर निळजेपाडा येथे ७०० मतदार असूनही, तेथे मतदानकेंद्रे नव्हती. त्यामुळे घेसरच्या मतदारांना वडवली तर, निळजेपाड्यातील मतदारांना निळजे येथे जावे लागले. प्रत्येक मतदाराला खड्डे आणि चिखल तुडवत एक ते दीड किलोमीटरची पायपीट करावी लागली, अशी नाराजी घेसरचे रहिवासी गजानन मांगरूळकर यांनी व्यक्त केली.

पलावा येथे निवडणूक यंत्रणेने उभारलेल्या सखी मतदान केंद्रात महिलांनी उत्साहाने मतदान केले. राजू पाटील यांनी या केंद्राला भेट देत तेथे मतदान सुरळीत आहे का, याची माहिती घेतली. मतदारसंघातील सगळी मतदानकेंद्रे तळमजल्यावर होती. मात्र, जेथे जास्त खोल्या तळमजल्यावर नाहीत, अशा ठिकाणची मतदानकेंद्रे अन्य ठिकाणी गेली. मागच्या निवडणुकीत ज्यांनी ज्या मतदानकेंद्रावर मतदान केले, तेथे त्यांचे मतदानकेंद्र नसल्याने त्यांनाही लांबचा फेरा पडला. तळमजल्यावर मतदानकेंद्र ही दिव्यांग मतदारांसह आबालवृद्ध मतदारांसाठी होती. मात्र, त्याचा फटका धडधाकट मतदारांना बसल्याचे सांगण्यात आले.

भिवंडी-पनवेल मार्गावरील फेºया रद्द :एसटी महामंडळाच्या कल्याण बसस्थानकातून दररोज ६७ बस विविध ठिकाणी चालविल्या जातात. ४७ बसपैकी कल्याण पश्चिम मतदारसंघाला कर्मचारी मतदानकेंद्रावर पोहोचविण्यासाठी ३१ बस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचे भाडे निवडणूक यंत्रणेकडून मंडळास दिले जाणार आहे. मात्र, ३१ बस निवडणुकीच्या कामाला गेल्याने सोमवारी भिवंडी, पनवेल आणि काही लांब पल्ल्यांच्या बसफेºया रद्द केल्या. लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सध्या आरक्षणही नव्हते. त्यात सोमवारी मतदानाची सुटी असल्याने बस परिचलनावर त्याचा फारसा परिमाण झाला नाही, अशी माहिती बस डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी दिली.

उजव्या हाताच्या बोटाला शाई : मतदानावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लावली जात होती. मात्र, काटई मतदानकेंद्रावर प्रत्येक मतदाराच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली जात होती. याविषयी स्थानिक रहिवासी चंद्रकांत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त करत निवडणूक आयोगाचा नियम काटई गावासाठी वेगळा आहे का, असा सवाल केला. मात्र, याचे स्पष्टीकरण अधिकाºयांना देता आले नाही.

मशीन, याद्यांच्या घोळामुळे मतदारांचा झाला नीरस : चिकणघर : कल्याणमधील वाडेघर येथील सावित्रीबाई फुले विद्यामंदिर शाळेतील मतदानकेंद्र क्र मांक १७ मध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने सव्वा तास वाया गेला. सकाळी ११.१५ ते १२.३० या दरम्यान ईव्हीएम बंद पडल्यामुळे बरेचसे मतदार घरी परतले. उंबर्डे गावातील मनपा शाळेतल्या बुथवरही १५ मिनिटे मशीन हँग झाले होते. मतदारयादीतील नावात प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे बारावे येथील एका महिला मतदाराला मतदानापासून वंचित राहावे लागले.

आधार, पॅन आणि रेशनकार्डप्रमाणे पार्वतीबाई शंकर मिरकुटे असे या महिलेचे नाव आहे. मात्र, यादीमध्ये पारबत शंकरशेट मिरकुटे छापलेले आहे. त्यामुळे फोटो मॅच होऊ नही त्यांना मतदान करू न दिल्याचे त्यांनी सांगितले. कातकरीवाडीतील १० ते १२ मतदारांची नावेच यादीतून गायब झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते, मात्र यादीत नावे नसल्याचे गोपाळ वाघे यांनी सांगितले.

संघर्ष समितीत उत्साहाचे वातावरण

केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा मुद्दा मनसेने आपल्या वचननाम्यात दिला आहे. त्याचबरोबर काँगे्रस व राष्ट्रवादीने मनसेला पाठिंबा दिल्याने सर्वपक्षीय संघर्ष समितीनेही याच मुद्यावर मनसेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, अर्जुन चौधरी आदी पदाधिकाºयांनी एकत्रित जमून मतदारांना मतदानाचे आवाहन केले. प्रत्येक गावात जाऊन त्यांनी मतदानाचा आढावा घेतला.

मतदानावर बहिष्कार : ऐन निवडणुकीच्या धामधुमीतही पाणी मिळत नसल्याने डोंबिवलीनजीकच्या देसलेपाडा येथील भद्रानगर सोसायटीने मते मागायला येऊ नका, असा फलक सोसायटीबाहेर लावला होता. पाण्याअभावी खाजगी टँकरवर ५० हजार रुपये खर्च करावे लागतात. पाण्याचे बिल भरूनही पाणी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, सोमवारीही सोसायटीतील १२८ सदनिकांमधील मतदारांनी मतदान केले नाही, अशी माहिती रहिवासी संतोष गुप्ता यांनी दिली.

उमेदवार, आमदारांनी केले मतदान

सगळ्यात प्रथम सकाळी मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांनी पत्नी आणि भाऊ विनोद पाटील यांच्यासह काटई गावातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर, शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांनी डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर येथे मतदान केले. मतदारसंघातील आमदार सुभाष भोईर यांनी पत्नी व मुलासह शीळ-डायघर येथे त्यांच्या घराजवळील मतदानकेंद्रात मतदान केले.

Web Title: In Kalyan Rural Constituency, voter turnout was 46.37 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.