कल्याण एसटी डेपोलाही फटका, १५ लाख रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:29 AM2018-07-11T01:29:17+5:302018-07-11T01:29:51+5:30
पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण एसटी डेपोला बसला आहे. दर दिवशी ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्याने तीन लाख याप्रमाणे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
कल्याण बस डेपोतून दिवसाला होणाºया ४४० फे-यांमधून सरसरी सात लाखांचे उत्पन्न मिळते. या डेपोतून नगर, नाशिक, पुणे, पालघर, विरार, बोईसर, मोखाडा, वाडा, जव्हार, मुरबाड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, बीड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग येथे बस जातात. मागील पाच दिवसांत पावसामुळे रेल्वे अनेकदा विस्कळीत झाली. त्यामुळे त्याचा रस्ते वाहतुकीवर आला.
कल्याण-पनवेल मागार्वरील कोंडीमुळे येजा करण्यासाठी एका बसला तब्बल पाच तास लागत आहेत. कल्याण-भिवंडी मार्गही जाम होत आहे. परिणामी फेºया घटल्या. मंगळवारी कोन गावानजीक रिक्षावर ट्रक पडला. त्यामुळे कोंडीत भरच पडली. भिवंडी-कल्याणची वाहतूक पडघामार्गे वळवण्यात आली. तेथेही एसटी बसचालकांना कोंडीचा सामना करावा लागला.
कल्याण-नगर मार्गावर दर १५ मिनिटांनी बस सुटते. परंतु, पावसामुळे रायता पूल अनेकदा पाण्याखाली गेला. त्यामुळे कल्याण-नगरदरम्यान बस फेºया होऊ शकल्या नाहीत. कल्याण- स्वारगेट-पुणे बसच्या सकाळी दोन आणि रात्री दोन गाड्या सोडल्या जातात. परंतु, पावसामुळे त्या रद्द कराव्या लागल्या. सोमवारी दिवसभरात ६६ बस फेºया रद्द झाल्या.
रस्त्यांची चाळण
पावसामुळे कल्याण-शीळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सूचकनाका येथील खड्ड्यात टाकलेले पेव्हर ब्लॉकही रस्त्यावर पसरले आहेत. पत्रीपुलावरही खड्डे आहेत. तेथील एक खड्डा दोनच दिवसांपूर्वी भर पावसात ट्रॅफिक वार्डनने बुजविला होता. त्याकडे रस्ते विकास महामंडळाने अद्याप लक्ष दिलेले नाही. हा खड्डा पावसामुळे मोठा झाला आहे. शिवाजी चौकतही मोठे खड्डे आहेत. कल्याण-खंबाळपाडा रोडवर चौधरी कंपाउंडजवळ पाणी साचल्याने रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. रेल्वेच्या रडकथेमुळे रस्ते वाहतुकीवर ताण आला होता.
रिक्षा प्रवाशांची लूट
कल्याण स्थानकातून भिवंडी, अंबरनाथ, डोंबिवलीकडे जाण्यासाठी रिक्षा मिळत नव्हता. कल्याण-डोंबिवली शेअर भाडे २२ रुपये असताना २५ रुपये घेतले जात होते. कल्याण-शीळ रस्त्यावर कोंडी झाल्याने पत्रीपूल परिसरात कोंडीचा ताण होता. कल्याण-डोंबिवली या सहा किलोमीटरच्या अंतरासाठी रिक्षेला एक तासापेक्षा जास्त वेळ लागत होता.
कच-याची दुर्गंधी
कल्याण-शीळ रस्त्यालगत मानपाडा पालीस ठाणे ते टाटा नाक्यापर्यंत रस्त्याच्या कडेचा कचरा उचलण्यात आलेला नव्हता. तो कुजून दुर्गंधी सुटली आहे. मिलापनगर येथे मुख्य रस्त्यावर कल्व्हर्टचे काम झाले आहे. मात्र, तेथे रस्त्यावर टाकलेली खडी इतरत्र पसरली आहे.