कल्याणला सुरू झाले महिला पोस्ट ऑफिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:23 AM2020-03-08T00:23:34+5:302020-03-08T00:23:43+5:30
या महिला डाकघरात चार महिला कर्मचारी असणार असून त्यांच्यामार्फतच ते चालवले जाणार आहे.
ठाणे/ कल्याण : महिलांची कामगिरी ही भारतीय डाकसेवेत अतिशय चमकदार व धडाडीची राहिली आहे. त्यामुळेच महिलांना चांगल्या कामासाठी गौरविण्यात आलेले आहे. भारतीय डाक विभागाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे डाक विभागात कल्याणच्या सुभाष रोडवर जिल्ह्यातील पहिलेवहिले महिला पोस्ट ऑफिस शनिवारी सुरू केले.
या महिला डाकघरात चार महिला कर्मचारी असणार असून त्यांच्यामार्फतच ते चालवले जाणार आहे. या पोस्ट ऑफिसमध्ये विविध डाकसेवांसह सुकन्या समृद्धी योजना सेव्हिंग बँक, आवर्ती खाते, मासिक आय योजना, सिनिअर सिटीजन खाते व पोस्टाचा नवीन उपक्र म इंडिया पोस्ट पेमेंट बँकही उपलब्ध आहे.
या महिला डाकघराचे शनिवारी ठाणे विभागाच्या प्रवर अधीक्षक रेखा रिजवी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ध्रुवी शिंगरे या तीन महिन्यांच्या कन्येचे सुकन्या समृद्धी योजनेचे खातेही उघडले आहे. या उपक्र माला नवी मुंबईच्या जनरल पोस्टमास्तर शोभा मधाळे यांचे मार्गदर्शन लाभले. ठाणे विभागात अंदाजे २०० महिलावर्ग असून या विभागाच्या प्रवर अधीक्षक तसेच नवी मुंबई क्षेत्राच्या जनरल पोस्टमास्तरही महिलाच आहेत.