कल्याण स्थानक रात्री प्रवाशांसाठी घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:01 AM2018-08-20T04:01:51+5:302018-08-20T04:02:20+5:30
गर्दुल्ले, भिकाऱ्यांना रान मोकळे, प्रवाशांची लूट, अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य
मुंबईकर बºयाचदा रात्रीच्यावेळी फिरण्यासाठी बाहेर पडतात. स्वत:च्या गाडीतून वरळी सीफेस, मरीन ड्राइव्ह येथे जातात. तिथे थंडगार हवेत गप्पांचा फड रंगतो. सोबत चणे, आइस्क्रीम किंवा वेफर्स असतात. तेथील मोकळ्या हवेत फेरफटका मारण्याचा आनंद मुंबईकर नेहमीच लुटतात. म्हणूनच, मुंबईची नाइट लाइफ ही वेगळी असते. तिचा अनुभव घेतलाच पाहिजे, असे मुंबईकर आवर्जून सांगतात. मुंबईकरांची नाइट लाइफ सुरक्षित असावी, यासाठी या भागांमध्ये कायम पोलीस बंदोबस्त असतो. हा परिसर उच्चभ्रू वर्गात मोडत असल्याने सर्वच यंत्रणांकडून तो सांभाळण्याची खबरदारी घेतली जाते. परिसरात घाण होऊ नये, म्हणून कचºयाचे डबे ठेवलेले असतात. याच्या अगदी विसंगत अनुभव कल्याणच्या नाइट लाइफमध्ये येतो. रात्रीच्यावेळी कल्याण शहरात खासकरून स्टेशन परिसरात तुम्ही आलात, तर तुमच्या नजरेस पडते ती अस्वच्छता, दुर्गंधी, गर्दुल्ले आणि भिकारी. येथील चित्र पाहिले की, क्षणभरही थांबू नये, असे वाटते.
खरेतर, कल्याण जंक्शन असल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांची, एसटी बसेसची सतत वर्दळ सुरू असते. अशावेळी या परिसराची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे. मात्र, पोलिसांचे सुरक्षेकडे आणि केडीएमसीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने रात्रीचे कल्याण हे भिकारी, गर्दुल्ल्यांना आंदण दिले की काय, असा प्रश्न पडतो. थोडक्यात, या मंडळींचे कल्याण होते. सामान्यांसाठी मात्र ती डोकेदुखी ठरते.
कल्याण स्थानकामध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. मात्र, त्याचा उपयोग काय, हे कळत नाही. अनैतिक व्यवसाय, गर्दुल्ले, मद्यपी रेल्वेस्थानक परिसर आणि फलाटांवर ठाण मांडून बसलेले असतात. हे सगळे सीसीटीव्हीत कैद होऊनही रेल्वे पोलीस कानाडोळा करतात. त्यांच्यावर पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई केली जात नाही. उलटपक्षी, एकमेकांवर जबाबदारी ढकलून हात वर केले जातात. वास्तविक, रेल्वेस्थानक परिसरात सतत वर्दळ असते. प्रवासी सामान घेऊन येजा करत असतात. या प्रवाशांमध्ये महिला आणि मुलींसह लहान मुलांचाही समावेश असतो. अशा परिस्थितीत सुरक्षेसाठी पोलीस असणे गरजेचे आहे. मद्यपींकडून प्रवाशांना त्रास झाला, तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. त्यामुळे रात्रीच्यावेळी कल्याण रेल्वेस्थानक किंवा परिसरातून जाताना कायम असुरक्षित वाटते. प्रवाशांना लुटण्याचे प्रकारही येथे झाले आहेत.
रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेविषयी पाच वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हा ६३ वा क्रमांक लागला होता. पाच वर्षांनंतर केलेल्या सर्वेक्षणात कल्याण स्थानकाची स्वच्छतेत घसरणच झाली आहे. आता ७४ वा क्रमांक आला आहे. क्वालिटी काउन्सिलच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अहवालावरून कल्याण रेल्वेस्थानकाच्या व्यवस्थापनाने धडा घेतलेला नाही. त्यामुळेच ही घसरण झाली आहे. याला कारणे अनेक आहेत. स्थानकाच्या स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च केले जातात. त्याचे कंत्राट दिलेले आहे. या कंपनीचे कामगार नियमित स्वच्छता करत नाही. सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर झाल्यानंतर त्यादिवशी कल्याण स्थानकाची स्वच्छता करण्यात आली. दोनचार दिवसांनंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीचा प्रत्यय प्रवाशांना येतो.
स्थानकात रात्रीच्यावेळी अनेक बेघर आश्रयाला येतात. मद्यपी, गर्दुल्ले आणि गुंगीच्या औषधांची नशा करणाºयांचा बाजार भरलेला असतो. विशेषत: फलाट क्रमांक-२ वर कॅन्टीनच्या बाजूलाच नशा करणाºयांचे टोळके बसलेले असते. त्यांच्याकडून प्रवाशांना त्रास दिला जातो. एखाद्या प्रवाशाने आवाज चढवला की, त्याचे बस्तान फलाट-१ वर हलवतात. ही मंडळी सकाळी आणि सायंकाळी फलाट-१ वरील सिग्नलच्या खाली बसून असतात. दारू पिणारे, भिकारी खाद्यपदार्थ तेथेच खातात. त्याचे कागद, डबे स्थानक परिसरातच फेकून देतात. काहीजण फलाटावरच घाण करतात. एका मद्यपीने फलाट-२ वरच लघुशंका केली. सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार दिसला. मात्र, त्यांना हुसकावून लावण्याची गरज पोलीस किंवा सुरक्षा दलाला वाटली नाही. अनेकदा भिकाºयांची फलाटावर झोपण्यावरूनही भांडणे होतात. हे प्रकार साधारणत: रात्री १२ वाजता सुरू होतात. १२ नंतर अनेकजण फलाटाचा आसरा घेऊन ताणून देतात. त्यामुळे हे फलाट आहे की, विश्रामगृह, असा प्रश्न पडतो.