कल्याण स्टेशन, मेट्रो, बस, परिवहन जोडणार, परिसर विकासासाठी महिनाभरात निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:27 AM2018-05-08T06:27:46+5:302018-05-08T06:27:46+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणाऱ्या कल्याण स्टेशन परिसराच्या विकासात सध्याचे रेल्वे स्टेशन, एसटी बस डेपो, परिवहन सेवा, मेट्रो रेल्वेचे स्थानक, रिक्षा-टॅक्सी तळ, पार्किंग अशा सर्व गोष्टी एकत्र जोडल्या जाणार असल्याचे प्रेझेंटेशन सोमवारी दाखवण्यात आले. या प्रकल्पावर ४६० कोटी खर्च केले जाणार असून त्याला मंजुरी मिळाली आहे.
कल्याण - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणाऱ्या कल्याण स्टेशन परिसराच्या विकासात सध्याचे रेल्वे स्टेशन, एसटी बस डेपो, परिवहन सेवा, मेट्रो रेल्वेचे स्थानक, रिक्षा-टॅक्सी तळ, पार्किंग अशा सर्व गोष्टी एकत्र जोडल्या जाणार असल्याचे प्रेझेंटेशन सोमवारी दाखवण्यात आले. या प्रकल्पावर ४६० कोटी खर्च केले जाणार असून त्याला मंजुरी मिळाली आहे. महिनाभरात त्याची निविदा प्रसिद्ध केली जाईल आणि सध्याची वाहतूक सुरू ठेवून तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
या कामाासाठी सध्या कल्याण पश्चिमेत असलेल्या स्कायवॉकचा दहा टक्के भाग तोडला जाणार आहे. या प्रेझेंटेशनमध्ये सध्या तरी मेट्रो रेल्वेचे मुख्य स्टेशन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत दाखवण्यात आले असून रेल्वे स्थानकाला त्याच्याशी जोडण्यात येणार आहे. मात्र हे अंतर मोठे असल्याने रेल्वे स्थानकाला जोडून नवे स्थानक उभारले जाणार आहे का, याबाबत संदिग्धता आहे.
कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेले भव्य एसटी स्टँड आणि त्या लगतच्या डेपोची जागा, तसेच रेल्वेची काही जागा या विकासासाठी ताब्यात घेतली जाणार आहे. सध्याच्या एसटी स्टँडच्या जागेतच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेला जागा करून दिली जाणार आहे. एसटीचे दहा फलाट गृहीत धरण्यात आले आहेत. अन्यत्र त्यापेक्षा जास्त फलाट असले तरी त्यांचा विचार झालेला नाही.
नव्या रचनेत एसटीला ३० फलाट आणि बहुमजली इमारत दिली जाणार आहे. ती १०० मीटर बाय ५० मीटर आकाराची असेल. १२ मीटर उंचीवरून उड्डाण मार्ग जाईल. त्यावरून चार चाकी आणि बसेस जातील. रिक्षा व दुचाकी वाहने जमिनीवरूनच जातील. तेथेच डेडिकेटेड सायकल ट्रॅक व सायकल स्टॅण्ड असतील. जुन्या महात्मा फुले पोलीस चौकीसमोरील दिलीप कपोते वाहनतळ पाडून नव्याने बांधले जाणार आहे. त्याची क्षमता वाढवली जाईल.
कल्याण स्टेशन परिसरातील अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करण्याचा उल्लेख या सादरीकरणात केलेला नाही. महापौर राजेंद्र देवळेकर यांनी हे प्रेझेंटेशन सादर केले. यावेळी गटनेते रमेश जाधव, नगरसेवक सुधीर बासरे, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा उपस्थित होते. स्टेशन परिसर विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीमॅट अॅण्ड ट्रॅकवेल्स कंपनीने तयार केला आहे. त्याला स्मार्ट सिटी कंपनीने मान्यता दिली आहे. स्टेशन परिसर विकासासाठी मध्य रेल्वेशी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. रेल्वेची काही जागा वापरणे, काही भागात रेल्वेच्या हवाई हद्दीचा (एअर स्पेस) वापर करण्यास मान्यता मिळाली आहे. बस डेपो विकासासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ना हरकत घेतली आहे.
कल्याण स्टेशन हे जंक्शन असल्याने तेथे दररोज दोन लाख ५० हजार प्रवासी ये- जा करतात. स्थानकातील फलाटांना जोडणाºया पादचारी पुलांनाच सध्याचा स्कायवॉक जोडलेला आहे. त्याचा वापर दीड लाख प्रवासी करतात. याच स्कायवॉकचा दहा टक्के भाग तोडून नव्याने बांधताना त्याच्या पहिल्या मजल्यावर व्हेडिंग झोन, दुसºया मजल्यावर कार पर्किंग तसेच तिसºया व चौथ्या मजल्यावर वाणिज्य वापरासाठी गाळे ठेवण्यात येणार आहेत.
रेल्वे स्थानकात परिसरातील प्रवासी आणि बससाठी येणाºया प्रवाशांसाठी सरकते जिने उभारले जातील. उन्नत मार्गावरुन रावसाहेब गोविंद कर्सन चौकाकडे जाण्यासाठी भानू-सागर चित्रपटगृहाजवळ स्वतंत्र लूप मार्ग बांधला जाईल. तसेच रेल्वे स्थानकापासून नियोजित मेट्रो रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी कनेक्टीव्हिटी असेल.
सुभाष चौक ते बस स्थानकापर्यंत उन्नत मार्गाची रुंदी १८ मीटर असेल. बस स्थानक ते कर्सन चौक उन्नत मार्ग आणि भानू-सागर चित्रपटगृहाजवळील लूप मार्गाची रुंदी नऊ मीटर असेल.
या कामाची निविदा महिनाभरात प्रसिद्ध झाल्यावर कार्यादेश देऊन प्रत्यक्ष काम आॅक्टोबर महिन्यात सुरु होईल. ते तीन वर्षे चालेल.
सिटी पार्क घालणार सौंदर्यात भर
कल्याण : केडीएमसीच्या २०१५ मध्ये निवडणुकीच्या वेळी कल्याणमध्ये सिटी पार्क उभारण्याचे वचन शिवसेनेने दिले होते. या पार्कची निविदा मंजूर झाली आहे. त्यामुळे महिनाभरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तारीख मिळताच त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार आहे.
शिवसेनेच्या वचननाम्यातील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पाठपुरावा केला होता. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी सिटी पार्कच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. याप्रसंगी केडीएमसीचे शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, गटनेते रमेश जाधव, नगरसेवक सुधीर बासरे उपस्थित होते.
केडीएमसी हद्दीत पर्यटनासाठी चांगले ठिकाण नाही. त्यामुळे सिटी पार्कची योजना पुढे आली. शिवसेनेने हे पार्क उभारण्याचे वचन निवडणुकीच्या वेळी दिले होते. उल्हास नदी किनाºयाला लागून असलेल्या योगीधाम, गौरीपाडा येथील ३० एकर जागेवर ११० कोटी खर्चून हे पार्क विकसित केले जाणार आहे. ३० एकरपैकी बहुतांश जागा ताब्यात आहे. पार्कमध्ये बांधकाम कमी असेल. तर ग्रीन एरियाची कामे जास्त असतील. पहिल्या टप्प्यात ७० कोटींच्या खर्चाची निविदा मंजूर झाली आहे. चव्हाण कंपनीला हे काम दिले असून, महिन्याभरात त्यांना कार्यादेश दिला जाईल.
सिटी पार्क हा पर्यावरण संतुलन राखणारा असेल. त्यात एक हजार ७०० झाडे लावली जातील. त्यापैकी ६५० झाडे ही कायमस्वरूपी हरित राहणारी, तर ९५० झाडे ही हंगामी स्वरूपाची असतील. तसेच एक मुव्ही स्क्रीन असेल. त्यात नैसर्गिक फिल येईल, अशी ध्वनि यंत्रणा त्यात असेल. त्याचबरोबर लेझर शोही सुरू केला जाईल. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा असेल. ग्रीन एरिया जास्त असल्याने इको-ट्युरिझमचा फिल देणारे हे सिटी पार्क असेल. मोकळ््या जागेत पाच हजार लोक कोणत्याही कार्यक्रमाचा आनंद घेतील, अशी व्यवस्था तेथे असेल. सोलार दिवे लावले जातील. एक मोठे रेस्टॉरंट, वाहनांसाठी पार्किंग, खेळासाठी सोयीसुविधा असतील. या पार्कमध्ये आल्यानंतर येथे चार ते पाच तास विरंगुळा होईल, अशा पद्धतीने हे बांधण्यात येणार आहे.