कल्याण स्टेशन परिसराचा होणार विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:19 AM2018-04-25T05:19:15+5:302018-04-25T05:19:15+5:30
आता परिवहन खात्याकडून महापालिकेस हा दाखला मिळाल्याने स्टेशन परिसर आणि बस डेपोच्या विकासाचाही मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याण : स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण स्टेशन परिसराच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, बस डेपो विकासासाठी परिवहन खात्याकडून ना-हरकत दाखला मिळाला नव्हता. त्यामुळे या परिसराच्या विकासकामाची निविदा रखडली होती. परंतु, आता परिवहन खात्याकडून महापालिकेस हा दाखला मिळाल्याने स्टेशन परिसर आणि बस डेपोच्या विकासाचाही मार्ग मोकळा झाला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात मंगळवारी झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीस एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान, महापालिका आयुक्त गोविंद बोडके, पोलीस उपायुक्त संजय शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, सभागृह नेते राजेश मोरे, प्राचार्य डॉ. नरेश चंद्र, काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा आदी मान्यवर उपस्थित होते.
स्मार्ट सिटी अंतर्गत २८ विकासप्रकल्पांवर काम करण्यात येणार आहे. त्यापैकी एरिया बेस डेव्हलपमेंटचे २० प्रकल्प आहेत. तर आठ प्रकल्प हे पॅन सिटीवर भर देणारे आहेत. दोन हजार ३०० कोटींच्या स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात एरिया बेस डेव्हलपमेंटमध्ये कल्याण स्टेशन परिसराच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. रेल्वे स्टेशनसमोरील बस डेपो पाच एकर जागेवर आहे. तो १९७२ मध्ये बांधण्यात आला होता. सध्या त्याची अवस्था बिकट आहे. डेपो अत्यंत अस्वच्छ आहे. स्टेशन परिसर विकासाचा करार मध्य रेल्वेशी झाला आहे. स्टेशन परिसर, बस डेपो आणि मेट्रो रेल्वेचे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील स्थानक या तिन्ही गोष्टी जोडल्या जाणार आहेत.
बस डेपोत खाली रिक्षा व ठाण्याच्या धर्तीवर पुलावरून बस सोडल्या जातील. त्यामुळे बस डेपोला स्मार्ट लूक मिळणार आहे. परिवहन खात्याच्या ना-हरकत दाखल्याअभावी स्टेशन परिसर विकासाची निविदा रखडली होती.
या संदर्भात परिवहन खात्याचे मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे नुकतीच एक बैठक झाली होती. त्यात ना-हरकत लवकरच दिली जाईल असे स्पष्ट केले होते. त्यानुसार हा दाखला मिळाला आहे. स्टेशन परिसर विकासासाठी ४०० कोटी रुपये खर्चाची निविदा महिन्याभरात काढली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष स्टेशन परिसराच्या विकासाला सुरुवात होणार आहे.
सिटी पार्कच्या पहिल्या टप्प्यासाठी ६४ कोटी मंजूर
स्मार्ट सिटी प्रकल्पात १०० कोटी खर्चून सिटी पार्क विकसित करण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला होता. या पार्कच्या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी ६४ कोटी खर्चाच्या निविदेला स्मार्ट सिटी प्रकल्प संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात गार्डनिंग व लॅण्ड स्केपिंगचे काम करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कन्स्ट्रक्शनचे वर्क केले जाणार आहे.