कल्याण-तळोजा मेट्रो मार्गी
By Admin | Published: October 29, 2016 04:06 AM2016-10-29T04:06:22+5:302016-10-29T04:06:22+5:30
तळोजा, शीळ, डोंबिवली, कल्याण परिसरातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेल्या तळोजा- डोंबिवली- कल्याण मेट्रो
कल्याण : तळोजा, शीळ, डोंबिवली, कल्याण परिसरातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेल्या तळोजा- डोंबिवली- कल्याण मेट्रो प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यातच या मार्गाला तत्वत: मंजुरी दिली.
शिंदे यांनी शुक्र वारी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. या वेळी कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
एमएमआरडीए आणि सिडको यांनी अनुक्र मे मुंबई आणि नवी मुंबईत आखलेले मेट्रो प्रकल्प परस्परांना जोडले, तर कल्याण, डोंबिवली, २७ गावे, शीळ फाटा, मुंब्रा, दिवा, कळवा, खारेगाव, उल्हासनगर, अंबरनाथ अशा महानगरांना त्याचा लाभ होईल, असे सादरीकरण शिंदे यांनी केले. त्यांनु सुचवलेल्या मेट्रो जोडणाऱ्या मार्गांत प्रामुख्याने तळोजा-शीळ फाटा-डोंबिवली-कल्याण, पोखरण-माजीवडा-खारेगाव-मुंब्रा-शीळ फाटा, महापे-शीळ फाटा, दिघा-खारेगाव आणि कासारवडवली-दहीसर या मार्गांचा समावेश आहे. शिंदे यांनी सुचवलेल्या या मार्गांचा अभ्यास करण्याचे निर्देश प्रकल्प सल्लागारांना लगेच देण्यात येतील, असे दराडे यांनी सांगितले.
एमएमआर परिसरातील लोकसंख्या वाढीचा वेग मुंबईपेक्षाही अधिक आहे. येथील लोकसंख्या सध्या एक कोटीच्या आसपास आहे. २०२१ मध्ये मुंबईपेक्षाही अधिक लोकसंख्या असेल. शिवाय, २७ गावांमधील ग्रोथ सेंटर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, दिल्ली - मुंबई फ्रेट कॉरिडॉर, नैना आदी प्रकल्पांमुळे पनवेल, उरण, तळोजा, २७ गावांच्या परिसराचा प्रचंड विकास होणार आहे. (प्रतिनिधी)
प्रवास होणार स्वस्त आणि मस्त
कल्याण, डोंबिवली, ठाणे, कळवा, मुंब्रा, शीळ फाटा, अंबरनाथ, उल्हासनगर या परिसरातून चाकरमानी मोठ्या प्रमाणावर नवी मुंबईच्या दिशेने जातील. ही गरज लक्षात घेऊन आतापासूनच मेट्रोचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे खा. शिंदे यांनी सांगितले.
हे प्रस्तावित मार्ग झाले तर मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनमधील प्रवासी एकाच तिकिटावर कुठूनही कुठेही आरामदायी आणि किफायतशीर प्रवास करू शकतील.