कल्याण तालुक्यात १६ कोटींचे नुकसान, अतिवृष्टी, पुराचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 01:07 AM2019-08-16T01:07:52+5:302019-08-16T01:08:27+5:30
कल्याण तालुक्यात २६, २७ जुलै आणि ४ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा मोठा फटका बसला होता.
- मुरलीधर भवार
कल्याण : तालुक्यात २६, २७ जुलै आणि ४ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा मोठा फटका बसला होता. कल्याण तहसील कार्यालयातर्फे पूरग्रस्तांचे पंचनामे सुरू असून आतापर्यंत २३ हजार कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. तालुक्यात १६ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, भरपाईपोटी राज्य सरकारकडे कल्याण तहसील कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही मदत मागितली आहे. दरम्यान, काही पूरग्रस्तांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याची तक्रार पूरग्रस्तांकडून केली जात आहे. तर, अजूनही काही भरपाई कधी मिळणार, असा सवाल करत आहेत.
अतिवृष्टीचा फटका तालुक्यातील उल्हास नदीकिनारी असलेल्या कांबा, वरप, रायता या गावांना जास्त बसला होता. तसेच शहरी भागातील कल्याण खाडी परिसर, रेतीबंदर, वालधुनी नदीकिनाºयालगतचा शिवाजीनगर, वालधुनी, अशोकनगर, तर कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, विठ्ठलवाडी स्मशानभूमी आणि डोंबिवलीतील खाडीकिनाºयालगतच्या घरांमध्ये पाणी शिरले होते.
पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढण्यापूर्वीच कल्याण तहसील कार्यालयाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले होते. या परिपत्रकानुसार ज्यांच्या घरात दोन दिवस पाणी होते, अशांना पाच हजार रुपये भरपाई दिली जाणार आहे. मात्र, ही रक्कम कमी असल्याने राज्य सरकारने त्यात वाढ करून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १५ हजार दिले जातील, असे जाहीर केले. मात्र, आता पंचनाम्यांनंतर तहसील कार्यालयाने सांगितले की, ग्रामीण भागात बाधित कुटुंबाला १० हजार तर, शहरी भागात १५ हजार रुपये दिले जातील. वास्तविक, दोघांचेही तितकेच नुकसान असताना सरकारकडून हा भेदभाव का, असा आरोप पूरग्रस्तांकडून केला जात आहे.
कल्याण खाडीकिनारी राहणारे अशरफ शेख यांच्या घरात पाणी शिरले होते. हा परिसर शहरी भागात असतानाही त्यांना सात हजार रुपये भरपाई दिली जाईल, असे पंचनाम्यासाठी आलेल्या महसूल विभागाच्या पथकाने सांगितले. नियमानुसार आपल्याला १५ हजार रुपये मिळायला हवेत. मग, सात हजारांचे आश्वासन का देण्यात आले, असा सवाल शेख यांनी केला आहे.
२६-२७ जुलैला आलेल्या पुरामध्ये अनेकांच्या घरांत पाणी होते. त्यानंतर, पुन्हा ४ आॅगस्टलाही त्याच घरांना पुराचा फटका बसला. मात्र, तरीदेखील मदत ही एकदाच दिली जाणार असल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.
प्रत्येककुटुंबाला १५ हजार भरपाई दिल्यास आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यांनुसार २३ हजार कुटुंबीयांना मदत दिल्यास त्याची रक्कम ३४ कोटी ५० लाख रुपये होते. परंतु, मागितलेली रक्कम ही १६ कोटीच आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम कधी मागणार. तसेच ज्यांचे पंचनामे झालेले नाहीत, ते कधी होणार व मदत कधी मिळणार, असा सवाल मदतीपासून वंचित असलेल्यांकडून केला जात आहे.
मरिन व कस्टमच्या जागेवरील घरांचे सर्वेक्षण नाही
कल्याण खाडीलगतची जागा मरिन व कस्टमच्या मालकीची असून, तेथील घरांचे सर्वेक्षण तहसील कार्यालयाने केलेले नाही. तेथील पूरग्रस्तांनी आमच्या घरांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांच्याकडे नुकतीच केली आहे. शेलार कल्याणमध्ये रविवारी एका कार्यक्रमासाठी आले असताना ही मागणी करण्यात आली. त्यावेळी भाषणात शेलार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदत देण्यासाठी मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते.
गहू, तांदूळवाटप सुरू
प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० किलो तांदूळ व १० किलो गहू दिला जात आहे. या वाटपासाठी शिधापत्रिका पाहिली जात आहे. मात्र, ती नसल्यास आधारकार्डाचा तपशील घेऊन धान्याचे वाटप सुरू आहे. खडवली येथील पूरग्रस्त विलास भोईर म्हणाले, धान्याचे कुपन्स मिळाले आहेत. मात्र, धान्य गावात येऊनही अद्याप ते मिळालेले नाही. तसेच आर्थिक मदतही अद्याप बँक खात्यात जमा झालेली नाही.
शाळांच्या मदतीचे काय?
कल्याण पश्चिमेतील मोहम्मदीया एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत ६३२ विद्यार्थी आहेत. या शाळेत सात ते आठ फूट पुराचे पाणी होते. त्यामुळे या शाळेचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारी यंत्रणेने पंचनामा करून साडेसात लाखांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे. शाळेने पंचनाम्याची प्रत मागितली असता त्यांना ती दिलेली नाही. पूरग्रस्तांमध्ये मदत फक्त बाधित घरातील एका कुटुंबाला दिली जात आहे. त्यामुळे शाळेला मदत मिळणार की नाही, याविषयी कुठलीही सुस्पष्टता सरकारच्या परिपत्रकात नाही. त्यामुळे शाळेच्या नुकसानीचा पंचनामा केवळ दाखवण्यासाठी केला की, खरोखरच आर्थिक भरपाई मिळणार आहे, या संभ्रमावस्थेत शाळा व्यवस्थापन आहे.