Kalyan: कल्याणमध्ये दहीहंडी साजरी करण्यावरुन ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव
By मुरलीधर भवार | Published: September 4, 2023 06:44 PM2023-09-04T18:44:04+5:302023-09-04T18:44:55+5:30
Kalyan Dahi Handi: -छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी साजरी करण्याची परवानगी ठाकरे गटाला नाकारण्यात आली आहे. पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली आहे. पोलिस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण -छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी साजरी करण्याची परवानगी ठाकरे गटाला नाकारण्यात आली आहे. पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली आहे. पोलिस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याठिकाणी ठाकरे गटाला दहिहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी उच्च न्यायालयाकडे या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
यंदा शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली होती. पोलिसांनी त्यांना छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी साजरी करण्याची परवानगी दिली आहे. छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी पोलिस प्रशासनाकडे मागितली होती. त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी ठाकरे गटाला दहिहंडी उत्सव करण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकाऐवजी दुसरी जागा सूचवावी असे सूचित केले आहे. ठाकरे गटाचे शहर प्रमुख बासरे यांनी सांगितले की, शिवसेना पक्ष एक असताना तेव्हापासून छत्रपती शिवाजी चौकात शिवसेनेकडून दहिहंडी साजरी केली जात आहे. शिवसेनेत फूट पडून ठाकरे आणि शिंदे गट झाले. त्यानंतरही मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी चौकात ठाकरे गटाला दहिहंडी साजरी करण्यासाठी परवानगी दिली गेली होती. ठाकरे गटाने त्याच ठिकाणी दहिहंडी साजरी केली होती. शिवसेनेची शहर शाखाही चौकाजवळच आहे. त्यामुळे परवानगी आम्हाला नाकारण्याचे कारणच नाही.
मात्र पोलिसांनी सांगितले की, ज्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्या पक्षाला परवानगी दिली आहे.
पोलिसांनी हे कारण देत ठाकरे गटाला दुसरी जागा सूचवा असे म्हटले असले तरी येत्या ७ सप्टेंबर रोजी दहिहंडी आहे. ठाकरे गटाकडे तयारीसाठी अत्यंत कमी वेळ आहे. ठाकरे गटाचे शहर प्रमुख बासरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणे अपेक्षित हेते. ७ सप्टेंबरपूर्वी या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केली आहे. उद्या ५ सप्टेंबर रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.