Kalyan: वाहतूक पोलिसाला मारहाण, दोघांना अटक; लोढा जंक्शन येथील घटना
By प्रशांत माने | Published: March 1, 2023 09:33 PM2023-03-01T21:33:38+5:302023-03-01T21:34:33+5:30
Kalyan: मोठया प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असलेल्या लोढा जंक्शन याठिकाणी वाहतूक नियमनाचे काम करणा-या वाहतूक पोलिसाला दुचाकीवरील दोघांनी मारहाण केल्याची घटना काल संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली.
- प्रशांत माने
डोंबिवली: मोठया प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असलेल्या लोढा जंक्शन याठिकाणी वाहतूक नियमनाचे काम करणा-या वाहतूक पोलिसाला दुचाकीवरील दोघांनी मारहाण केल्याची घटना काल संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी भगवान गोरपेकर आणि दिपक कांबळे या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
कोळसेवाडी वाहतूक पोलिस शाखेतील हवालदार मधुकर हरिभाऊ घुगे हे सकाळी ९ वाजल्यापासून लोढा जंक्शन याठिकाणी वाहतूक नियमनाचे काम करीत होते. संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान लोढा जंक्शनला मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू होती. त्यावेळी कोंडी उदभवू नये यासाठी हवालदार घुगे यांच्याकडून वाहनांना ये-जा तसेच थांबण्याचे इशारे केले जात होते. त्यावेळेस एका दुचाकीस्वाराला थांबण्याचा त्यांनी इशारा केला पण तो न थांबता घुगे यांना शिवीगाळी करीत पुढे निघून गेला.
त्यास पुन्हा आवाज देऊन घुगे यांनी थांबविले असता त्याने त्याच्या साथीदारासह घुगे यांना हाताबुक्याने मारहाण केली. यात घुगे यांच्या गणवेशावरील सरकारी नेम प्लेट, तीन बटणे आणि खांदयावरील फितीचे नुकसान झाले आहे. दरम्यान सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याच्या गुन्हयाखाली दुचाकीवरील गोरपेकर आणि कांबळे या दोघांना अटक करण्यात आल्याची माहीती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली.