कल्याण-उल्हासनगरात शिवथाळी, शिवभोजन केंद्रांची संख्या झाली १०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:22 AM2020-02-17T00:22:45+5:302020-02-17T00:23:31+5:30
नागरिकांचा प्रतिसाद : शिवभोजन केंद्रांची संख्या झाली १०
पंकज रोडेकर
ठाणे : जिल्ह्यातील कल्याण आणि उल्हासनगर या दोन महापालिकांमधील नागरिकांनाही येत्या काही दिवसांत १० रुपयांमधील शिवथाळीचा आस्वाद चाखता येणार आहे. या दोन्ही महापालिकांतर्गत प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. या दोन महापालिकांसह नवी मुंबई महापालिकेतील एका केंद्राला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील केंद्रांची संख्याही दहावर पोहोचली आहे. तसेच नव्याने सुरू होणारी केंदे्र संगणकाला जोडल्यानंतर त्या केंद्रांवर येत्या २० फेब्रुवारीपासून थाळीवाटप कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
राज्यात शिवभोजन योजनेंतर्गत प्रजासत्ताकदिनी १० रुपयांमध्ये शिवथाळीचा आस्वाद चाखण्यास सुरुवात झाली. ही थाळी प्रायोगिक तत्त्वावर महापालिका कार्यक्षेत्रात चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात एक हजार ३५० थाळ्यांपैकी ६७५ थाळ्यांसाठी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या महापालिका सोडल्या, तर ठाणे, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई या महापालिकांतर्गत एक ूण सात केंद्रे सुरू झाली. यामध्ये ठामपांतर्गत तीन, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक आणि भिवंडीत दोन असा केंद्रांचा समावेश आहे. या योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने शिधावाटप विभागाने ठाणे जिल्ह्यातील काही केंद्रांवरील थाळ्यांची संख्या वाढवून दिली आहे.
या केंद्रांनी अटी केल्या पूर्ण
उर्वरित ६७५ थाळ्या सुरू करण्यासाठी तितक्या केंद्रांची गरज असल्याची बाब डोळ्यांसमोर ठेवून शिधावाटप विभागाने शासनाच्या अटी आणि शर्तीनुसार केंद्र शोधण्यास सुरू केले होते. त्यानुसार, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली तसेच उल्हासनगर येथे प्रत्येकी एक कें द्र त्या अटीशर्ती पूर्ण करू शकले आहे. यामुळे संख्या १० वर गेली आहे.