Kalyan: उंबर्डेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा होणार कायापालट, संस्था व्यवस्थापन समितीचे नियोजन
By अनिकेत घमंडी | Published: June 12, 2023 06:47 PM2023-06-12T18:47:17+5:302023-06-12T18:47:43+5:30
- अनिकेत घमंडी कल्याण - येथील उंबर्डे परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विविध कामांना गती मिळणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण ...
- अनिकेत घमंडी
कल्याण - येथील उंबर्डे परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विविध कामांना गती मिळणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद महावितरणच्या कल्याण परिमंडलाकडे असून समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत विविध कामांतून संस्थेचा कायापालट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिमंडल कार्यालयाच्या सभागृहात समितीची बैठक झाली. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण महासंचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले.
संस्था व्यवस्थापन समितीकडे उपलब्ध असलेला निधी खर्च करण्यासाठी समितीच्या बैठकीत ठराव संमत करून निविदाच्या माध्यमातून औद्योगिक संस्थेत आवश्यक सुविधा उभारण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानुसार संस्थेत स्वच्छ पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती, रंगरंगोटी व वीजपुरवठ्याचे अद्ययावतीकरण, संगणक प्रयोगशाळा विकसित करणे, खेळाचे मैदान तयार करणे, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सुधारणे यासह विविध कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. या बैठकीला समितीचे सचिव, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मनोज पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंते, समितीचे सदस्य दीपक पाटील, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी महेश जाधव, प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक विवेक शिंदे उपस्थित होते.