कल्याण विहीर दुर्घटना: विहिरीच्या सफाईकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; गोस्वामी कुटुंबीयांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 04:36 AM2018-11-02T04:36:13+5:302018-11-02T04:36:41+5:30
भीमाशंकर मंदिराच्या शेजारील विहिरीत बुडून गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. याच विहिरीशेजारी एक नाला आहे. या नाल्यातील रसायनयुक्त सांडपाणी विहिरीत मिसळले जाते.
कल्याण : पूर्वेतील भीमाशंकर मंदिराच्या शेजारील विहिरीत बुडून गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. याच विहिरीशेजारी एक नाला आहे. या नाल्यातील रसायनयुक्त सांडपाणी विहिरीत मिसळले जाते. त्याची सफाई करण्यात यावी, यासाठी गेली तीन वर्षे गोस्वामी कुटुंब महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. मात्र, याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप गोस्वामी कुटुंबीयांनी केला.
या विहिरीच्या सफाईसाठी सफाई कामगार कमलेश यादव दुपारी २च्या सुमारास उतरला होता. तो बराच वेळ होऊनही वर न आल्याने मंदिर परिसरातील राहुल गोस्वामी विहिरीत उतरला. सफाई कामगार, त्यापाठोपाठ राहुलही बराच वेळ बाहेर न आल्याने राहुलचे वडील गुणवंत उर्फ गुणाभाई विहिरीत उतरले. मात्र, तेही बेपत्ता झाले. विजेचा धक्का लागल्याने हे तिघे बुडाल्याचा अंदाज होता. त्यामुळे खबरदारी म्हणून विद्युतपुरवठा खंडित केला.
माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमनचे जवान घटनास्थळी पोहोचले. दलातील अनंत शेलार हे विहिरीत उतरत असतानाच विषारी वायूमुळे चक्कर येऊन विहिरीत कोसळले. त्यांना पडल्याचे पाहून अग्निशमन दलाचे प्रमोद वाघचौरे हे विहिरीत उतरले. मात्र, प्रमोदला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात विषारी वायूमुळे तेही विहिरीत पडले. बराच वेळ होऊनही पाचपैकी एकही जण वर न आल्याने खळबळ उडाली.
अधिकाऱ्याची प्रकृती खालावली
बचावकार्यामध्ये आघाडीवर असणारे फायर अधिकारी नामदेव चौधरी यांना प्रदूषित वायूचा त्रास झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी स्थानिक रहिवासी, पोलीस, अधिकारी आणि पत्रकार यांनादेखील दूषित वायूमुळे त्रास झाला.
खबरदारी म्हणून घटनास्थळी सुरक्षापट्टा लावण्यात आला आहे. अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. विहिरीतले पाणी ढवळल्याने त्यातून विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर आला आणि त्यामुळे पाच जण गुदमरले. अग्निशमन दलाला विहिरीतल्या विषारी वायूच्या तीव्रतेचा अंदाज आला नाही.