कल्याण विहीर दुर्घटना: ‘तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने गेला भाऊ, पुतण्या’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 12:14 AM2018-11-02T00:14:50+5:302018-11-02T00:15:32+5:30

विहिरीतील प्रदूषणाविषयी, येथील सांडपाण्याच्या अर्धवट पडलेल्या कामाविषयी वारंवार पाठपुरावा केला. कुणीही आमचे ऐकले नाही. आता पाचजणांचे जीव गेल्यावर तरी जागे व्हा, असे गिरीगोस्वामी संतापाच्या सुरात बोलले.

Kalyan Vihoor Accident: 'When the complaint was neglected, brother, nephew' | कल्याण विहीर दुर्घटना: ‘तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने गेला भाऊ, पुतण्या’

कल्याण विहीर दुर्घटना: ‘तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने गेला भाऊ, पुतण्या’

Next

- मुरलीधर भवार 

कल्याण : चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिराची पूजा गिरीगोस्वामी बंधू गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. माझा भाऊ शंकराची पूजा करायचा. त्याने कोणाचे काय वाकडे केले होते की, आमच्या कुटुंबावर हा प्रसंग आला. माझा भाऊ गुणवंत व पुतण्या राहुल गेला. दुश्मनावरही असा प्रसंग येऊ नये... हसमुख गिरीगोस्वामी एकीकडे धाय मोकलून रडत होते आणि दुसरीकडे पोटतिडकीने बोलत होते. या विहिरीतील प्रदूषणाविषयी, येथील सांडपाण्याच्या अर्धवट पडलेल्या कामाविषयी वारंवार पाठपुरावा केला. कुणीही आमचे ऐकले नाही. आता पाचजणांचे जीव गेल्यावर तरी जागे व्हा, असे गिरीगोस्वामी संतापाच्या सुरात बोलले.

हसमुख यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबात चौघे भाऊ. हेमंत, मनसुख, गुणवंत आणि हसमुख. चारही भावांची घरे भीमाशंकर मंदिराला लागूनच आहेत. देवाची सेवा करणे, हेच त्यांचे काम आहे. गुणवंत हे मंदिरात पूजेचे काम करायचे. मुलगा राहुल हादेखील त्यांच्या मदतीला होता. राहुलचे पुढच्या वर्षी लग्न करायचे होते. मात्र, काळाने वडिलांसह त्याच्यावर घाला घातला. दिवाळीच्या आधीच आमच्या घरातील दोन दिवे मालवले आणि अंधार पसरला... हसमुख यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. मृत्यूचा हा आघात इतका भीषण आहे की, काय करायचे तेच सुचत नाही. गुणवंत यांच्या पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे. विहिरीतील प्रदूषणाच्या त्रासामुळे हसमुख यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला, असे ते सांगतात. त्यांचे भाऊ गुणवंत यांच्याही हृदयावर प्रदूषणाच्या त्रासामुळे विपरित परिणाम झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यातून ते कसेबसे बचावले होते. मात्र, आज त्यांना मृत्यूने गाठलेच. राहुल यांच्यासह गुणवंत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर गुजरातमधील भावनगर येथील मांडवी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Kalyan Vihoor Accident: 'When the complaint was neglected, brother, nephew'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.