खड्ड्यांत गेले ‘कल्याण’! डोंबिवलीतही चालकांची चकवाचकवी : परतीच्या पावसाचा रस्तादुरुस्तीत व्यत्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:56 AM2017-10-12T01:56:36+5:302017-10-12T01:56:48+5:30
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र डागडुजीअभावी रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘रांगोळी’ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.
कल्याण : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र डागडुजीअभावी रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘रांगोळी’ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. कल्याण आणि डोंबिवलीत जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे चुकवताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पाऊस पूर्णपणे थांबल्यावरच रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करणार असल्याचे केडीएमसीने स्पष्ट केल्याने ‘जा रे जा रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा या सणांमध्ये खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. परंतु, सध्याचे वास्तव पाहता दिवाळीतही खड्ड्यांचा त्रास कायम राहण्याची चिन्हे आहेत. शहरातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक खचल्याने त्या रस्त्यांनी प्रवास करणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. स्थायी समिती असो अथवा महासभेमध्ये वारंवार खड्ड्यांचा मुद्दा चर्चिला गेला आहे. स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी, तर रस्त्यांच्या कामात दर्जा राखला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. गणेश विसर्जनाआधी रस्ते खड्डेमुक्त होतील, असे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले होते. परंतु, सध्या दिवाळी तोंडावर आला तरी रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही.
नुकत्याच झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सभा तहकुबीच्या माध्यमातून खड्ड्यांचा विषय सभागृहात उपस्थित केला होता. तसेच विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनीही मांडलेल्या तहकुबीच्या आधारे या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी आयुक्तांनी जोपर्यंत पाऊस थांबत नाही, तोपर्यंत कामे सुरू होणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिले होते. हवामान खात्याशी संपर्क असून त्यांच्याकडून पावसाबाबत माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, खड्ड्यांची समस्या दिवसागणिक अधिकच गंभीर बनत चालली आहे. त्यात परतीच्या पावसाने उच्छाद मांडल्याने पाण्याने भरलेल्या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. खड्ड्यांत पडून काहीजण जायबंदी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेलरासू यांनी रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजवण्याची कामे सुरू करण्याच्या सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु, पडणाºया पावसात टाकण्यात येणारे डांबर अल्पावधीत उखडले जात आहेत. यासंदर्भात नगरसेवकांच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, सध्याचा परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने रस्त्यांची कामे सुरू करण्यास कोणताही अधिकारी धजावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणे आता दिवाळीतही खड्ड्यांचा त्रास नागरिकांच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे.