Kalyan: महिलांविषयी कुजबुज करणे चळवळीसाठी घातक- आशालता कांबळे
By सचिन सागरे | Published: May 13, 2023 05:42 PM2023-05-13T17:42:31+5:302023-05-13T17:42:46+5:30
Kalyan: चळवळ मजबूत करण्याच्या अडथळ्यात महिलांविषयी करण्यात येणारी कुजबुज हे एक महत्वाचे कारण आहे. अशाप्रकारच्या कुजबुजमुळे चळवळ बॅकफुटला येत असल्याचे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक आशालता कांबळे यांनी येथे व्यक्त केले.
- सचिन सागरे
कल्याण - चळवळ मजबूत करण्याच्या अडथळ्यात महिलांविषयी करण्यात येणारी कुजबुज हे एक महत्वाचे कारण आहे. अशाप्रकारच्या कुजबुजमुळे चळवळ बॅकफुटला येत असल्याचे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक आशालता कांबळे यांनी येथे व्यक्त केले. समता संघर्ष संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त 'संवाद चळवळीचा' हा कार्यक्रम पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर सभागृह येथे शनिवारी पार पडला. चार सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचे उद्घाटन आशालता यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांसोबत त्यांनी संवाद साधला.
संविधान संस्कृती रुजविण्यासाठी साहित्य व कलाक्षेत्र योग्य दिशेने विकसित करणे गरजेचे आहे. चळवळ जिवंत ठेवायची असेल तर त्यासाठी लेखन करणारे, बोलणारे आणि कृती करणारे असे सर्वच चळवळीसाठी आवश्यक आहेत. त्याचबरोबर, सखोल अभ्यास करणेही तितकेच महत्वाचे आहे. तरुणांसाठी साहित्य संमेलन होत नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करीत दर महिन्याला विविध प्रकारची शिबिरे घेऊन कार्यकर्ता घडविण्याचा सल्लाही आशालता यांनी यावेळी दिला.
तरुण कार्यकर्ते घडविणे महत्वाचे असून तरुण कार्यकर्त्याची फळी कशी तयार होईल या दृष्टीने संघटनेने काम करणे महत्वाचे असल्याचे अध्यक्षीय भाषणात फुले - मार्क्स - आंबेडकरवादी ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम जाधव म्हणाले. स्वागताध्यक्ष सदानंद गायकवाड यांनी समता संघर्ष संघटनेच्या कामाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. कार्यकर्ता कुठे चाललाय, कुठे हरवलाय यावर आपल्या बीजभाषणात समता संघर्ष संघटनचे अध्यक्ष शैलेश दोंदे यांनी प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सुरेखा पैठणे यांनी केले.