कल्याण एसटी डेपो हटवणारच
By admin | Published: April 21, 2016 02:23 AM2016-04-21T02:23:57+5:302016-04-21T02:23:57+5:30
कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी करण्यासाठी स्टेशन परिसर मोकळा व्हावा, असा दावा करत रेल्वे स्थानकालगत मोक्याच्या जागी असलेला बस डेपोचा भूखंड ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे
कल्याण : कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी करण्यासाठी स्टेशन परिसर मोकळा व्हावा, असा दावा करत रेल्वे स्थानकालगत मोक्याच्या जागी असलेला बस डेपोचा भूखंड ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. कर्मचारी-प्रवाशांचा विरोध डावलून हा डेपो तेथून हलवून शहराबाहेर नेण्याच्या भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांच्या मागणीला परिवहन राज्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. त्या जागी डेपो पोर्ट तयार करण्यासाठी अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या दालनात बुधवारी यासंदर्भात बैठक पार पडली. तिला पालिकेचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, आरटीओचे अधिकारी एन. नाईक आदी उपस्थित होते. स्थानिक वाहतूक डेपोतूनच सुरू राहावी आणि बाहेरगावी जाणाऱ्या बससाठी शहराबाहेर खडकपाडा येथे डेपो असल्यास वाहतूककोेंडीचा प्रश्न सुटेल, असा पवार यांचा दावा आहे. त्यांच्या मागणीच्या आधारे राज्यमंत्री देशमुख यांनी एसटी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना पोर्ट तयार करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
>प्रवाशांना अकारण भुर्दंड
कल्याण डेपोतून २५५ बस फेऱ्या होतात. ७० बस डेपोत आहेत. ८० हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीणसह बीड, नगर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, सातारा, सांगली, कराड, सोलापूर आदी भागांत प्रवासी प्रवास करतात. १९७२ पासून डेपो अस्तित्वात आहे. पाच एकर जागा महामंडळाच्या मालकीची आहे. बाहेरगावी जाणाऱ्या बसचा डेपो खडकपाड्याला नेल्यास डेपो पोर्ट होईल. मात्र, प्रवाशांना खडकपाड्याला जाण्यासाठी सध्याच्या भाड्यानुसार किमान ६० रुपये भाडे मोजावे लागेल.