कल्याण कुस्तीगिरांना मिळाली आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:42 AM2021-08-23T04:42:36+5:302021-08-23T04:42:36+5:30
कल्याण : पूर्वेतील भागातील नांदिवली परिसरातील जय बजरंग तालीम संघातील कुस्तीगिरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत ...
कल्याण : पूर्वेतील भागातील नांदिवली परिसरातील जय बजरंग तालीम संघातील कुस्तीगिरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपलब्ध करून दिली आहे. या मॅटचे उद्घाटन शनिवारी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुस्तीगिरांत उत्साहाचे वातावरण होते.
कल्याण-डोंबिवली कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोणे हे अनेक वर्षांपासून नांदिवली परिसरात जय बजरंग तालीम संघ चालवितात. सरकारकडून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. लोकसहभागातून ही तालीम चालवून त्यांनी अनेक कुस्तीगीर घडविले आहे. त्यांनी जिल्हा आणि राज्य पातळीवर नाम कमविले आहे. या संघातील कुस्तीगिरांना प्रशिक्षणासह सराव करण्यासाठी मॅट हवी होती. खासदारांनी त्यांना मॅट उपलब्ध करून दिली आहे. उद्घाटन कार्यक्रमावेळी विविध वयोगटांतील कुस्तीगिरांनी नव्या मॅटवर कुस्तीची प्रात्याक्षिके दाखविली. माजी सरपंच रामदास ढोणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खासदारांनी कोळी टोपी परिधान केली होती.
कार्यक्रमात खासदार म्हणाले की, वेळ आणि काळ बदलला आहे. कुस्ती हा मराठी मातीतील खेळ आहे. आता मातीतील कुस्तीप्रमाणेच मॅटवरही कुस्ती खेळली जात आहे. या संघाला मॅटची गरज असल्याचे कळताच त्यांना मॅट दिली आहे. या मॅटवर त्यांनी चांगले प्रशिक्षण घेऊन सराव करावा. महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताबाहेर कुस्तीत नाव गाजवावे, असे आवाहन केले. कुस्ती म्हटले की, कोल्हापूर डोळ्यासमोर येते. मात्र, कुस्तीत कल्याण-डोंबिवलीचे नाव पुढे यावे. यावेळी नि:स्वार्थीपणे जय बजरंग तालीम संघ चालविणाऱ्या गुरुजी पंढरीनाथ ढोणे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना संघासाठी काही मदत लागल्यास ती केव्हाही हक्काने मागावी, ती पुरविली जाईल, असे आश्वासन खासदारांनी यावेळी दिले.
रस्ता, तलावासाठी निधी देणार
नांदिवली ते माणेरे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यासाठी दहा कोटींचा निधी आणि नांदिवली येथील तलावाच्या विकासासाठी २५ लाखांचा खासदार निधी देण्याचे खासदार शिंदे यांनी यावेळी घोषित केले.
फोटो-कल्याण-श्रीकांत शिंदे.
------------------------------------