कल्याणामध्ये विद्यार्थिनीचे कापले केस, भार्इंदरमध्येही महिलेचे केस कापल्याची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:31 AM2017-08-20T03:31:16+5:302017-08-20T03:31:20+5:30
कल्याण : पूर्वेतील गोविंदवाडी परिसरात राहणाºया १४ वर्षांच्या मुलीचे केस अनोळखी व्यक्तीने कापल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. आठवीत शिकणारी ही मुलगी रात्री घरात अभ्यास करत असताना अचानक बेशुद्ध पडली. तिचे केस कापण्यात आल्याचे तिच्या भावाच्या निदर्शनास आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
कापलेले केस तिच्या शेजारीच पडलेले होते. तिच्या तोंडावर पाणी मारून भावाने तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. यापूर्वी डोंबिवलीतील पिसवली व कल्याण-मलंग रोडवर केस कापण्याच्या घटना घडल्या आहेत.
भार्इंदरमध्येही महिलेचे केस कापल्याची घटना
मीरा रोड : कांदिवली, नालासोपारा, भिवंडी आदी ठिकाणी महिलांचे केस कापण्याच्या घटनांनी खळबळ उडालेली असतानाच शनिवारी सकाळी भार्इंदरमधील गणेश देवलनगरात राहणाºया दशरथी लोध या महिलेचे केस कापल्याचा प्रकार उघडकीस आला.
महिला चक्कर येऊन पडली व त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू असल्याचे पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांनी सांगितले. पश्चिमेच्या गणेश देवलनगरमध्ये पती व दोन मुलांसोबत राहणारी दशरथी शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घराबाहेर भांडी धूत असताना तिला तिचे केस कापले गेल्याचे लक्षात आले आणि ते पाहून ती बेशुद्ध पडली. शेजाºयांनी तिला पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर आहे.