ग्राहकांअभावी कल्याणचा मेट्रो मॉल बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:01+5:302021-08-20T04:46:01+5:30
कल्याण : दोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जात असल्याने ग्राहकांची संख्या कमालीची रोडावली ...
कल्याण : दोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जात असल्याने ग्राहकांची संख्या कमालीची रोडावली आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेला मेट्रो मॉल बंद ठेवण्याची वेळ व्यवस्थापनावर आली आहे.
मेट्रो मॉलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या पाच हजार आहे. ६५ पेक्षा जास्त दुकाने असलेल्या या मॉलमध्ये वेगवेगळे शॉपिंग ब्रॅण्ड, सिनेमागृहे, आदी आहेत. मॉलची उलाढाल महिन्याला २५ कोटी रुपये एवढी आहे. राज्य सरकारने मॉल सुरू करण्याची परवानगी १५ ऑगस्टपासून दिली. मात्र, लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्याची अट ठेवली. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्याचा नियम लागू केला असता, मॉलमध्ये ग्राहक फिरकले नाहीत. १७ आणि १८ ऑगस्ट या दोन दिवसांतही ग्राहक फिरकले नसल्याने केवळ मॉल सुरू ठेवून उपयोग काय, असा सवाल करीत मॉल बंद केल्याची माहिती ऑपरेशन मॅनेजर स्वप्निल सायगावकर यांनी दिली आहे.
केवळ कल्याण डोंबिवली महापालिकेचा विचार करता १७ ऑगस्टपर्यंत ६ लाख ५३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १ लाख ७३ हजार होती. लसीकरणाची सुरुवात जानेवारी महिन्यात झाली. प्रथम फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना प्राधान्य दिले. त्यानंतर अन्य वयोगटातील नागरिकांची सुरुवात करण्यात आली. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीचे डोस देणे सुरू केले. लसीकरणाचा वेग अत्यंत मंद आहे. अनेक वेळा महापालिकेचे लसीकरण लसीच्या साठ्याअभावी बंद ठेवले जाते. त्यामुळे दोन डोस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. दोन डोसची अट शिथिल केल्यास मॉल सुरू ठेवणे शक्य होईल याकडे मॉल व्यवस्थापनाने लक्ष वेधले आहे.
-------------------