कल्याणच्या स्मार्ट सिटीत खोडा, आयुक्त बोडके यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:33 AM2019-06-26T01:33:11+5:302019-06-26T01:33:27+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेची आॅगस्ट २०१६ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यानंतर तीन वर्षांत सिटी पार्क प्रकल्पाचा अपवाद वगळता आत्तापर्यंत ८९१ कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत.

Kalyan's smart city news | कल्याणच्या स्मार्ट सिटीत खोडा, आयुक्त बोडके यांची कबुली

कल्याणच्या स्मार्ट सिटीत खोडा, आयुक्त बोडके यांची कबुली

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची आॅगस्ट २०१६ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यानंतर तीन वर्षांत सिटी पार्क प्रकल्पाचा अपवाद वगळता आत्तापर्यंत ८९१ कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एकाही निविदेस प्रतिसाद प्राप्त झाला नसल्याने स्मार्ट सिटी प्रकल्पास विलंब होत असल्याची कबुली महापालिका आयुक्त गोेविंद बोडके यांनी मंगळवारी दिली. मात्र तरीही स्मार्ट सिटीचे सगळे प्रकल्प २०२३ अखेर पूर्ण करण्याचा दावा आयुक्तांनी केला.
स्मार्ट सिटी संदर्भात माहिती देण्यासाठी बोडके यांनी मंगळवारी प्रकल्पाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आयुक्तांनी उपरोक्त दावा केला आहे. महापालिकेने स्मार्ट सिटीकरिता १ हजार ५४९ कोटींचा प्रस्ताव सरकारला सादर केला. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तीन प्रकारचे प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. एरिया बेस डेव्हलपमेंट, पॅन सिटी आणि कन्व्हर्जन्स् या तीन प्रकारात शहर विकसित केले जाणार आहेत. एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत सहा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याकरीता ९७८ कोटी ६६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पॅन सिटी विकासांतर्गत प्रकल्पांसाठी ३२३ कोटी ४४ लाख खर्च केले जाणार आहेत. कन्व्हर्जन्स् प्रकल्पांतर्गत २४६ कोटी ९५ लाख खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पांकरिता महापालिकेस केंद्र सरकारकडून १९० कोटी, राज्य सरकारकडून ९८ कोटी आणि महापालिकेच्या हिश्श्याचे २७ कोटी असा ३१५ कोटींचा निधी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीकडे उपलब्ध आहे. त्यापैकी कंपनी कार्यालयाची जागा, फर्निचर, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग यासाठी १० कोटी ७ लाख रुपये खर्च झालेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
कल्याण स्टेशन परिसराचा विकास करण्याकरिता ३९५ कोटी रुपयांची निविदा मागवली आहे. ती निश्चित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. कल्याण पूर्वेतील स्टेशन परिसराचा विकास प्रस्तावित आहे. त्याला रेल्वेने मंजुरी दिलेली नाही. कल्याण पूर्वेच्या दिशेने यार्डाच्या मोकळ््या जागेचा वापर करुन रेल्वे स्थानकाचा विस्तार केला जाणार आहे. तेथे आणखी सहा फलाट प्रस्तावित आहेत. त्यामुळे कल्याण पूर्वेतील स्टेशन परिसरातील विकासाला रेल्वेकडून मंजुरी दिली गेलेली नाही, याकडे बोडके यांनी लक्ष वेधले.
कल्याण व डोंबिवलीला २९ किलोमीटर अंतराचा खाडीकिनारा आहे. त्यापैकी २ किलोमीटर अंतराचा किनारा सुशोभित करण्याचा वॉटर फ्रंट डेव्हलमेंटच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झालेला आहे. तो येत्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
काळा तलावाचा अंशता: विकास झालेला आहे. काळा तलाव परिसराचा आणखी विकास बाकी असल्याने त्याचा पुढचा विकासाचा टप्पा स्मार्ट सिटीत घेण्यात आला आहे. त्याचा डीपीआर बोर्डाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच काळा तलावाचा चोहोबाजूने विकास होणार आहे.
त्याचबरोबर ई गव्हर्नन्स, स्मार्ट सोल्यूशन जीएसआय, आयटीएमएस, स्मार्ट विद्युतपुरवठा, स्मार्ट पाणीपुरवठा, सौरउर्जा प्रकल्प, पाणीपुरवठा व मलनिस्सारण सुविधा व्यवस्थापन ‘स्काडा’ प्रणाली राबविणे हे विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत. तब्बल २४ प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्यापैकी एरिया बेस विकास प्रकल्पांतर्गत सहा पैकी चार प्रकल्पांचे डीपीआर तयार झाले आहे. तसेच पॅन सिटी अंतर्गत दहा प्रकल्पापैकी सहा प्रकल्पाचे डीपीआर तयार झाले आहे, असे आयुक्त म्हणाले.

सिग्नल यंत्रणा, डोंबिवली स्थानकाचा विकास

शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कल्याणमधील ८० किमीचे रस्ते सुधारणा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. सिग्नल यंत्रणा अद्यावत करण्यात येणार आहे, असे आयुक्त म्हणाले.
डोंबिवली स्टेशन परिसराच्या विकासाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच ठाकुर्ली स्टेशन परिसराचाही एकात्मिक विकास करण्याचा उद्देश आहे, असे बोडके यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर व स्मार्ट सिटी प्रकल्पास पूरक कल्याण पश्चिमेला सापड, वाडेघर, उंबर्डे येथे ७५० हेक्टर जागेवर विकास परियोजना राबविली जाणार आहे. त्यासाठी कोरियन कंपनीशी करार झाला आहे. कोरियन कंपनी त्यात गुंतवणूक करणार आहे. त्याच्या अंतिम मान्यतेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्याला येत्या तीन चार महिन्यात मान्यता मिळणे अपेक्षित आहे.

Web Title: Kalyan's smart city news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.