कल्याणच्या यात्रेचा ‘स्मार्ट सिटी’वर भर
By admin | Published: March 20, 2017 01:56 AM2017-03-20T01:56:53+5:302017-03-20T01:56:53+5:30
‘कल्याण संस्कृती मंचा’तर्फे कल्याणमध्ये नववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेचा भर ‘स्मार्ट सिटी’वर असणार आहे.
कल्याण : ‘कल्याण संस्कृती मंचा’तर्फे कल्याणमध्ये नववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेचा भर ‘स्मार्ट सिटी’वर असणार आहे. त्याचबरोबर, ‘बेटी बचाव’, ‘कचरा वर्गीकरण’ आदी विविध विषयांवर आधारित चित्ररथ स्वागतयात्रेत सहभागी होतील.
‘कल्याण संस्कृती मंचा’ने यंदाच्या स्वागतयात्रेचे प्रायोजकत्व याज्ञवल्क्य संस्थेला दिले आहे. या संस्थेचा ६० वर्षांतील कार्याचा आढावा घेणारा चित्ररथ प्रमुख आकर्षण असणार आहे. ‘याज्ञवल्क्य’चे अध्यक्ष राधाकृष्ण पाठक, विश्वस्त राजीव जोशी, ‘संस्कृती मंचा’चे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सुधाकर दिवेकर आदींचा या यात्रेत पुढाकार राहणार आहे.
या यात्रेत ६० चित्ररथ असतील. २८ तारखेला सकाळी ६.३० वाजता महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते यात्रेचा प्रारंभ गुढी उभारून केला जाणार आहे. यात्रेत १० शाळांतील विद्यार्थी व लेझीम पथके सहभगी होतील.
सिंडिकेट येथून यात्रा सुरू होईल. ती मुरबाड रोड, सिंडिकेट, सुभाष चौक, सहजानंद चौक, शिवाजी चौक, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, टिळक चौक येथून तिचा समारोप नमस्कार मंडळाजवळ होईल. (प्रतिनिधी)