कल्याणमध्ये चोहीकडे ‘कमळ’, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 05:38 AM2018-12-18T05:38:34+5:302018-12-18T12:23:17+5:30

भाजपाचे शक्तिप्रदर्शन : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात झेंडे आणि पोस्टरबाजीला ऊत

 'Kamal' in Chowk to Kalyan, Prime Minister Narendra Modi in Mumbai today | कल्याणमध्ये चोहीकडे ‘कमळ’, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत

कल्याणमध्ये चोहीकडे ‘कमळ’, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत

Next

मुरलीधर भवार

कल्याण : शिवसेना आणि कल्याण यांचे दृढ नाते वर्षानुवर्षांचे असले तरी सध्या कल्याण शहरात कुठेही नजर फिरवली तर ठिकठिकाणी कमळाची पोस्टर्स, बॅनर्स आणि झेंडे दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो व सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी कल्याणमध्ये येत असताना शिवसेनेचा धनुष्यबाण दिसणारे कोपरे कमळाने गिळले आहेत.

मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी एक वाजता कल्याणमधील फडके मैदानात कार्यक्रम होणार आहे. मुंबईतील कोस्टर रोडच्या कार्यक्रमात शिवसेनेनी भाजपला डावलले. त्याचं उट्टं भाजपाने मोदींच्या हस्ते होत असलेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिवसेनेला बाजूला ठेवून काढले आहे. मोदींच्या स्वागतासाठी मुंबईपासून कल्याणपर्यंतचे सर्व रस्ते भाजपाने सजवले असून शहर कमळमय झाले आहे. भाजपाच्या या आक्रमकतेचा मुकाबला करण्याकरिता मेट्रोसाठी पाठपुरावा शिवसेनेकडून करण्यात आल्याचे भले मोठे होर्डिंग कल्याण भिवंडी रस्त्यावर झळकले आहे. तसेच व्हॉटस्अप व फेसबुकवर युतीमधील मेट्रोच्या संघर्षाच्या संदेशांचा पाऊस पडत असल्याने चर्चा सुरु आहे. कल्याणमध्ये मोदी येणार याचीच चर्चा सगळीकडे सुरु आहे.

आघाडी सरकारच्या काळात ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्पाची घोषणा झाली होती. ही मेट्रो उल्हासनगरपर्यंत आणली जाईल असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उल्हासनगर येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेच्या वेळी दिले होते. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आघाडीचा फज्जा उडाला. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आले. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची साथ मोदी यांना होती. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा स्वबळावर लढले. केंद्रातील मोदी लाटेमुळे शिवसेनेला आपल्या नेतृत्वाखाली सत्ता आणता आली नाही. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली. या प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या होत आहे. कोस्टल रोडच्या कार्यक्रमात शिवसेनेने भाजपाला स्थान दिले नाही. त्याचा वचपा भाजपाने कल्याणच्या कार्यक्रमात काढला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ३२ हजार कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ होत असल्याचे होेर्डिंग, बॅनर ठाण्यापासून कल्याणपर्यंत झळकले आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेवरुन शिवसेनेच्या टीमने भले मोठे होर्डिंग लावून मेट्रो रेल्वेसाठी शिवसेनेकडून पाठपुरावा केला होता, असा दावा केला आहे. मेट्रोमुळे लाखो प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार अशा आशयाचे हे बॅनर सरळसरळ भाजपा व शिवसेनेतील वितुष्ट जाहीर करणारे आहेत. आपल्या नेतृत्वाला डावलल्याबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे विचारणा केली असता ‘उद्या काय होते ते पहा’, असा गर्भीत इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले आहे.
 

सभेच्या काळात अंत्यसंस्कार नाही

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाचे स्थळ असलेल्या फडकै मैदानालगत लालचौकी स्मशानभूमी आहे. मोदींच्या कार्यक्रमादरम्यान या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या दरम्यान एखादे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आले, तर त्याला अन्य स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी पाठवले जाणार आहे. उद्या स्मशानभूमी बंद राहणार असल्याचा तोंडी आदेश वरिष्ठांनी दिला असल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले.

३५ मिनिटे बोलणार मोदी
च्पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. कपिल पाटील यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. रस्त्यावर श्रेयवादाची बॅनरबाजी सुरु असली तरी राजशिष्टाचारानुसार शिंदे पिता-पुत्रास व्यासपीठावर स्थान दिले आहे.
च्महापौर विनिता राणे यांना कार्यक्रमास बोलावले असले तरी त्यांना व्यासपीठावर स्थान दिलेले नाही. बॅनरवर मोदी यांचा कार्यक्रम दुपारी एक वाजता असल्याचे नमूद केला असले तर सरकारी कार्यक्रमपत्रिकेत कार्यक्रमाची सुरुवात चार वाजता होणार असल्याचे नमूद केले आहे. व्यासपीठावरील मोजक्याच लोकांना प्रत्येकी पाच मिनिटे बोलण्याची अनुमती दिली जाणार आहे. तर मोदी यांचे भाषण तब्बल ३५ मिनिटे होणार आहे, असे कार्यक्रमपत्रिकेत म्हटले आहे.

बाजार समितीत पार्किंग
दुर्गाडी खाडी पूलावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी येणारी वाहने दुर्गाडी चौकातून गोविंदवाडी बायपास रस्त्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच दुर्गाडी चौकात एक स्वागत कक्ष तयार करण्यात आला आहे.

मेट्रोचा प्रतीकात्मक डबा फिरतोय कल्याणमध्ये
मोदीच्या हस्ते भूमिपूजन होत असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो रेल्वेचा एक प्रतिकात्मक डबा तयार करण्यात आला आहे. हा डबा शहरात फिरवला जात आहे. भाजपाकडून कार्यक्रमासाठी जोरदार वातावरण निर्मिती केली गेली आहे.

सर्वत्र झेंडेच झेंडे
कल्याण शहरात ठिकठिकाणी मोदीच्या आगमनाचे बॅनर झळकले असून शहरातील सर्व चौक आणि दुभाजकांवर भाजपाचे झेंडे लावण्यात आले आहेत. दुर्गाडी चौकात महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा संरक्षक कठडा भाजपच्या झेंड्यांनी वेढला आहे.

Web Title:  'Kamal' in Chowk to Kalyan, Prime Minister Narendra Modi in Mumbai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.