लेखणीबंद आंदोलनाचा कामगार सेनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:02 AM2020-11-16T00:02:31+5:302020-11-16T00:03:22+5:30
भाईंदर पालिका : निर्णय होऊनही अंमलबजावणीचा पत्ताच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा राेड : कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महापालिकेत सहा वेळा बैठका व निर्णय होऊनही अंमलबजावणी मात्र केली जात नाही. तर याबाबत वेळ मागूनही कर्मचाऱ्यांच्या संघटनेलाच वेळ दिला जात नसेल तर लेखणी बंद आंदोलन करू, असा इशारा शिवसेनाप्रणीत मीरा-भाईंदर कामगार सेनेने पालिका आयुक्तांना दिला आहे.
मीरा-भाईंदर कामगार सेनेच्या वतीने सरचिटणीस श्याम म्हाप्रळकर यांनी आयुक्तांना या इशाऱ्याचे पत्र दिले आहे. त्यामध्ये पात्र सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये डावलणे, वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना वर्ग ३ वर पदोन्नती देणे, १२ व २४ वर्षे सेवा केलेल्यांना पदोन्नतीचा लाभ, सुटीच्या दिवशी काम केलेल्याचा मोबदला द्या, २५ वर्षे सेवा झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे, रोख रकमेचा विमा, परिचारिका आदींना पदोन्नती द्यावी, पालिकेचे सभागृह आदी वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना मोफत, भाड्याने द्यावेत आदी ३२ मागण्या दिलेल्या आहेत.
प्रशासनासोबत जानेवारी २०१७ ते जानेवारी २०२० दरम्यान सहा वेळा बैठका झाल्या आहेत. लेखी आश्वासने देऊनही अजूनही पूर्तता केली जात नाही.
आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असता पालिकेने आश्वासने दिल्याने ती स्थगित करण्यात आली. पण मागण्यांसाठी विनंती करूनही अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त मुख्यालय यांनी वेळ दिला
नाही.
उपायुक्त अजित मुठे यांनी ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्यांची यादी पुन्हा देण्यास सांगितले. ती देऊनही तीन महिने झाले तरी कार्यवाही केली गेली नाही.
माेठी संघटना
२१ नोव्हेंबरपर्यंत वेळ न दिल्यास २४ नोव्हेंबरपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा म्हाप्रळकर यांनी दिला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेनेची मीरा-भाईंदर कामगार सेना ही सर्वात मोठी कर्मचारी - अधिकाऱ्यांची संघटना आहे.