भर पावसात भिवंडीतील कामवारी नदी प्रदूषित; केमिकल सोडल्याने नदीवर पांढऱ्या फेसाचा तवंग
By नितीन पंडित | Published: June 21, 2024 04:59 PM2024-06-21T16:59:07+5:302024-06-21T17:00:46+5:30
भिवंडी शहरालगत असलेल्या भिवंडीतील कामवारी नदी आजूबाजूच्या डाईंग,साइजिंग व केमिकल कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे.
नितीन पंडित, भिवंडी: शहरालगत असलेल्या भिवंडीतील कामवारी नदी आजूबाजूच्या डाईंग,साइजिंग व केमिकल कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. या नदीकडेप्रदूषण नियंत्रण मंडळासह, महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामपंचायतींचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे.
मागील काही दिवसांपासून या नदीत घातक केमिकल सोडण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच या नदीत केमिकल कंपन्यांनी प्रदूषित विषारी केमिकल नदीत सोडल्याने सकाळपासून नदीवर पांढऱ्या रंगाचा फेसाचा तवंग पसरला होता. हा पांढरा तवंग एखाद्या ढगांप्रमाणे नदीवर पसरलेला दिसत होता. शहरातील एकमेव असलेली कामवारी नदी प्रदूषित होत असतानाही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असून प्रदूषण नियंत्रण मंडळ आता तरी डोळे उघडणार का, असा सवाल येथील नागरिक करत असून काही दिवसांपूर्वी घातक केमिकल मुळे नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचेही काही नागरिकांनी सांगितले.