प्रदूषणाच्या विळख्यात अडकली कामवारी नदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 01:17 AM2019-01-21T01:17:13+5:302019-01-21T01:17:32+5:30

मागील काही वर्षात भिवंडी शहराची लोकसंख्या वाढली असून, त्या मानाने पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा झालेली नाही.

Kamwari river stuck in the know of pollution | प्रदूषणाच्या विळख्यात अडकली कामवारी नदी

प्रदूषणाच्या विळख्यात अडकली कामवारी नदी

googlenewsNext

- पंढरीनाथ कुंभार
भिवंडी- मागील काही वर्षात भिवंडी शहराची लोकसंख्या वाढली असून, त्या मानाने पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा झालेली नाही. परिसरात पाऊस पडूनही ते साठवण्यासाठी पालिका प्रशासनाने कुठलेच पाऊल उचलले नाही. पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही.
मा गील काही वर्षापासून शहराची लोकसंख्या वाढत असताना त्या मानाने पालिकेकडून सुविधा मात्र पुरवल्या जात नाही यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. शहर व तालुक्यातील पाण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. यासाठी स्त्रोत वाढविण्यापेक्षा केवळ कागदी घोडे नाचविले जातात. योजना मात्र पुढे सरकण्याचे नाव घेत नाही. तर पाणी साठविण्याच्या नावाखाली राबविलेल्या योजनेमध्ये भ्रष्टाचाराचे पाणी मुरले आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या वाढत आहेत.
खरे तर, गेल्या काही वर्षापासून भिवंडी व परिसरात जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र या पाण्याची साठवणूक करण्याचे काम मागील अनेक वर्षापासून थांबले आहे.माणूस दररोज किमान १७ ग्राम रसायन टाकून पाणी प्रदूषित करीत असल्याचे अनुमान अभ्यासकांनी काढले आहे. अशा स्थितीत निदान महापालिकेकडून सांडपाण्याचे शुध्दीकरण करून ते पाणी खाडीत सोडणे अपेक्षित आहे. मात्र याकडे प्रदूषण विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. तर कामवारी नदीचे पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे.
शहरात वाहत येणाऱ्या कामवारी नदीचा उगम तालुक्यातील तुंगारेश्वर डोंगरावरून वाहणाºया पाण्यातून झाला आहे. पावसाळ्यात या डोंगरावरून वाहत जमिनीवर आलेले पाणी देपोली-साक्रोली या गावातून कामवारी नदीतून पुढील गावात जाते. हा पाण्याचा प्रवाह नाला व ओढ्यातून विविध गावांतून वाहत तो शहराच्या सीमेवर येतो. ही नदी केवळ पावसाळ्यात प्रवाहीत होत असली तरी या नदीचे पाणी नदीपात्रात उन्हाळ्यापर्यंत राहत होते. मात्र जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे हे पाणी उन्हाळ्याअगोदर वाहून जाऊन किंवा जमिनीत मुरुन ही नदी कोरडी पडू लागली आहे. वास्तविक ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमामुळे हे पाणी नदीपात्रात विविध ठिकाणी अडवून त्याचा उपयोग दुबार पीक किंवा भाजीपाल्यासाठी करता येणे शक्य होते. परंतु हे पाणी न अडविल्याने ते शहराकडे येऊन खाडीच्या पाण्यात मिसळते. नदीचे पाणी अडविण्यासाठी भिवंडी-वाडा मार्गावर शहराच्या सीमेवर धरण बांधले आहे.हे धरण बांधल्याने जवळजवळ आठ ते दहा गावांतील गुरे व श्ोतकºयांना या पाण्याचा लाभ होत होता. त्यावेळी नदीचे पात्रही मोठे होते. परंतु शहराची लोकसंख्या वाढल्याने सीआरझेड कायदा धाब्यावर बसवून नदीकाठी घरे-इमारती उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस लहान होऊ लागले आहे. याबाबत पालिका प्रशासन व महसूल विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने अतिक्रमणास प्रोत्साहन मिळाले. पावसाळ्यात नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे नदीचे पाणी शहराच्या पश्चिमेतील ग्रामीण भागातील शेतीसाठी जात होते. परंतु पुढे कालवार-खारबावच्या हद्दीत रेतीबंदर झाल्याने खाडीचे पात्र मोठे होऊन ते पाणी मोठ्या प्रमाणात शहराकडे येऊ लागले. पश्चिमेकडून येणाºया खाडीतून समुद्राचे पाणी शहरापर्यंत येऊ लागल्याने नदीनाका ते बंदरमोहल्ल्यापर्यंत नदीचे गोडे पाणी व खाडीचे खारेपाणी एकत्र होऊ लागल्याने कारवली गावासह पुढील शेतकºयांना शेतीसाठी पाण्याचा लाभ मिळणे बंद झाले. त्यातच नदीचे पात्र ठिकठिकाणी लहान झाल्याने पावाळ्यात येणारे पाणी शहराच्या सीमेवरील धरणावरून उलटून जाऊ लागले. हेच पाणी धरणाची उंची वाढवून साठविले असता ते शहराच्या नागरिकांना पिण्यासाठी उपयोगात आले असते.
भिवंडी महापालिका सध्या ११३ एमएलडी पाणी स्टेम आणि मुंबई महापालिकेकडून विकत घेत आहे. परंतु याकडे एकही राजकीय नेता लक्ष देत नाही. परंतु शहरात पाणीटंचाई झाल्यास प्रशासनासमोर दंड थोपटून उभे राहतात.
नदीचे पाणी धरणावरुन उलटून गेल्यानंतर ते खाडीच्या पाण्यात मिसळते. दरम्यान नदीनाका येथील झोपडपट्टी व म्हाडा कॉलनीतील खाडीच्या पाण्यात अतिक्रमण केलेले रहिवासी याच पाण्यात कचरा टाकतात. तर ग्रामीण भागातील शेलार व खोणी गावात असलेल्या डाइग व सायझिंगचे रासायनिक पाणी या पाण्यात मिसळले जाते. तर शहरातील सांडपाणी याच पाण्यात सोडले जाते.
>शेती नापीक झाली
या घाणीत डाइग व सायझिंगचे रासायनिक पाणी असल्याने पूर आल्यानंतर हे पाणी कारीवली, नवघर, वडूनवघर, खारबाव आदी गावातील शेतकºयांच्या शेतात जाऊन त्यांची शेती नापीक झाली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रार करूनही खाडीकिनारी असलेल्या डाइग व सायझिंगचे प्रदूषित पाणी प्रक्रिया करून खाडीत सोडले जात नाही. तर महापालिका व ग्रामपंचायतही सांडपाण्यावर प्रक्रिया करत नाही.
>प्रदूषणाचा रहिवाशांना त्रास
या पाण्यात घाणीचे प्रमाण वाढल्याने आदर्शपार्क ते बंदर मोहल्ल्यापर्यंत खाडीकिनारी राहणाºया रहिवाशांना अतोनात
प्रदूषणाचा त्रास होत आहे. त्यामुळे आजाराचे व डासांचे प्रमाण वाढत आहे. या प्रदूषित पात्रात सुमारे वीस फूट खोल घाण साचल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २००६ मध्ये पूर आल्यानंतर ही घाण काढण्यासाठी सरकारने साधनसामग्री महापालिकेला पुरविली होती. परंतु पालिकेने ही घाण काढण्याकडे दुर्लक्ष केले.

Web Title: Kamwari river stuck in the know of pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.