भिवंडीत विविध संस्थांचे ठिकठिकाणी कॅन्डल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:32 AM2018-04-18T00:32:57+5:302018-04-18T00:32:57+5:30
भिवंडी : उन्नाव,कटवा,सासाराम,सुरत येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणाहून रात्रीच्या सुमारास कॅन्डल मार्च काढण्यात आला.या कॅन्डलमार्च मध्ये शेकडोंच्या संख्येने स्त्रि-पुरूष सहभागी झाले होते.
महानगरपालिकेच्या समोर भिवंडी काँग्रेस कमिटीच्या वतीने देशांतील विविध ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ रात्री ९ वाजताच्या सुमारास कॅण्डल मार्च काढण्यात आला.हा कॅण्डल मार्च आनंद दिघे चौकातून पुढे हसिन टॉकीज मार्गे कापआळीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाऊन मार्चचे विसर्जन करण्यात आले. या मार्चच्या सुरूवातीस काँग्रेस कमिटीच्या वतीने मनिषा मनोज म्हात्रे,अनुषा मसुना,रेहाना अन्सारी आदि महिलांनी भाषणे करून झालेल्या घटनेचा निषेध केला आणि अपराध्यांना फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी केली आहे. या मार्चमध्ये महापौर जावेद दळवी,प्रदेश सरचिटणीस प्रदिप रांका,शहराध्यक्ष शोअेब गुड्डू यांच्यासह पदाधिकारी व बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.
त्याचप्रमाणे आनंद दिघे चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील उन्नाव,कटवा,सासाराम,सुरत आदि ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. या प्रसंगी मनसे शहराध्यक्ष प्रदिप बोडके,मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष साळवी आदि मनसैनिक उपस्थित होते.
तसेच तंजीम उलेमा ए अहिले सुन्नतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशांत बेटी बचाव नारा फोल ठरल्याचे सांगत भाजप सरकारचा निषेध केला. तसेच अपराध्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी करीत मौलाना युसूफ रजा यांच्या नेतृत्वाखाली कोटरगेट मजीद जवळ मेणबत्ती पेटवून या बलात्काराच्या घटनेचा निषेध केला.
शहरातील जैतुनपुरा मंगळवार स्लॅबवर आसिफा प्रकरण व उन्नाव प्रकरणी न्याय मिळावा यासाठी रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत कॅण्डलमार्च काढण्यात आला.या मार्चचे नेतृत्व समीर मोमीन यांनी केले.
शहरात ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या कॅण्डलमार्च मुळे रात्रीची वहातूक विस्कळीत झाली होती. शहरातील हे सर्व कार्यक्रम पुर्व नियोजीत असताना वहातूक पोलीस घटनास्थळी हजर नव्हते.त्यामुळे वाहनचालक बेशिस्तीने गाड्या चालवित होते. खाजगी व सरकारी बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना अर्धवट प्रवास संपवून मध्येच रस्त्यात उतरावे लागले. तर काही उत्साही तरूणांच्या दुचाकी चालविण्यामुळे छोटे-मोठे अपघात झाले. मात्र बंदोवस्तास असलेल्या पोलीसांनी वहातूक कोंडीकडे दुर्लक्ष केले.