दिवा रेल्वेलाइन विस्तारात कांदळवनांचा बळी जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:26 AM2018-06-18T03:26:21+5:302018-06-18T03:26:21+5:30
ठाणे ते कल्याणदरम्यान रेल्वेलाइन विस्तारीकरणाचे काम सुरू असून यात मुंब्रा ते दिवा खाडीलगत असलेले कांदळवन तोडण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.
ठाणे : ठाणे ते कल्याणदरम्यान रेल्वेलाइन विस्तारीकरणाचे काम सुरू असून यात मुंब्रा ते दिवा खाडीलगत असलेले कांदळवन तोडण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.
मध्य रेल्वेवर पाच व सहा क्रमांकांच्या लाइनच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात मुंब्रा व दिवा खाडीतील मोठ्या प्रमाणात कांदळवन जाणार असून ते तोडल्याशिवाय काम पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी खाडीतील किती क्षेत्रावरील कांदळवन तोडावे लागणार आहे, याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
याशिवाय, वनविभागाकडून त्यासाठी आवश्यक असलेली परवानगीदेखील घ्यावी लागणार आहे. यासाठी रेल्वेकडून परवानगीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
या रेल्वेलाइन विस्तारीकरणाच्या आधीदेखील या खाडी परिसरातील कांदळवन रेतीमाफियांकडून नष्ट करण्यात आले आहे.
>यापूर्वी रेतीमाफियांवर कारवाई
दिवा परिसरात व मुंब्य्राजवळील खाडीपुलालगतचे कांदळवन यापूर्वीच नष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले असता संबंधित रेतीमाफियांवर जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील कारवाई केली. मात्र, आता पुन्हा पाच व सहा क्रमांकाच्या रेल्वेलाइनच्या विस्तारासाठी कांदळवन नष्ट होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.